रत्नागिरी जिल्ह्य़ात मंगळवारी सकाळी वादळी वारे आणि विजेच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू ओढवला.
राजापूर तालुक्यातील पेंडखळे गावात अक्षय सुभाष गुरव (वय १७ वष्रे) हा तरुण घराच्या व्हरांडय़ात सकाळी झोपला असताना विजेच्या धक्क्यामुळे मरण पावल्याचे उघडकीस आले आहे. मित्राच्या लग्नासाठी अक्षय मुंबईहून गावी आला होता. आज सकाळी पेंडखळे गावाच्या परिसरात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या वेळी व्हरांडय़ात झोपलेले अक्षयचे अन्य नातेवाईक घरात गेले. थोडय़ा वेळाने त्याचे काका शरद शांताराम गुरव घरातून बाहेर आले असता गोठय़ामध्ये बांधलेली गाय विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. व्हरांडय़ात झोपलेल्या अक्षयला त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्धावस्थेत असल्याचे आढळून आले. म्हणून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अक्षयने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. आई व भावासह तो मुंबईत राहत होता. मित्राचे लग्न आटोपून मंगळवारी तो मुंबईला परत जाणार होता. त्यापूर्वीच दुर्दैवाने मृत्यूने त्याला गाठले.
या परिसरातील अनुष्का सुर्वे याही विजेच्या लोळाचा धक्का बसल्याने काही वेळ बेशुद्ध पडल्या होत्या. तसेच काहीजणांच्या घरातील विजेची उपकरणे जळाल्याचेही प्रकार घडले.
लांजा परिसरातही मंगळवारी सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. लांज्यापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील देवधे येथे दोन महिला रिक्षाने जात असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाची फांदी मोडून रिक्षावर पडली. त्यामुळे दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. सुरेखा राजाराम कुरूप (वय ६० वष्रे) आणि उज्ज्वला एकनाथ खामकर (वय ५५ वष्रे). रिक्षाचालक या अपघातात जखमी झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा