लोकसत्ता प्रतिनिधी
रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यासह काही ठिकाणी गुरुवारी पहाटेच्या सुमारास विजाच्या कडकडाट आणि ढगांच्या आवाजासह मुसळधार पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने आंबा काजू बागायतदारांची झोप उडवली आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी आंबा गळून पडल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.
रत्नागिरीसह संगमेश्वर,लांजा, राजापुर तालुक्यात गुरुवारी पहाटे सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाण्याचे तळे साचले. कडकडणा-या विजांमुळे आणि ढगांचा गडगडाटामुळे भीतीचे वातावरण तयार झाले होते. जोरदार सुरु झालेल्या पावसामुळे वीज गेल्याने ग्रामीण भागातील जनजीवन ही विस्कळीत झाले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पडलेल्या या पाऊसामुळे कोकणातील आंबा बागायतदारांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
कोकणाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असताना पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबा व काजूच्या बागा संकटात सापडल्या आहेत. या हंगामात आंबा बागायतदारांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार असून बागायतदारांना फक्त १० ते १५ टक्केच उत्पन्नावर समाधान मानावे लागणार आहे. पडणा-या पावसामुळे आंबा पिकांवर बुरशीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा फवारणी करण्याची वेळ आली आहे. यामुळे बागायतदारांवर आणखी मोठा आर्थिक बोजा पडणार आहे.
जिल्ह्यात पडलेल्या या मुसळधार पावसामुळे आंबा बागायतदारांमध्ये कमालीची चिंता वाढली असून याबहंगामाच्या सुरुवातीलाच अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.
अस्मानी संकटानंतर कोकणातील आंबा उत्पादनाला पुन्हा उभारी देण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वयाची गरज आहे. शासन स्तरावर नुकसानग्रस्त आंबा काजू बागायतदारांना आर्थिक मदत करण्यात यावी. अन्यथा बागायतदार कर्जाच्या खाईत लोटला जाईल. -दिगंबर पटवर्धन, पोमेंडी, रत्नागिरी, आंबा बागायतदार.