रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग येथे गेल्या २४ तासात तब्बल १८४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्य़ातील २८ पकी २५ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली असून, अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला आहे. येत्या २४ तासात जिल्ह्यात पावासाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
संपूर्ण पावसाळ्यात अनुभवला नसेल असा पावसाचा जोर रायगडकरांनी या दोन दिवसात अनुभवला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अलिबाग येथे १८४ मिमी, पेण येथे १५० मिमी, मुरुड येथे १०६ मिमी, सुधागड पाली येथे १४१ मिमी, माणगाव येथे १४१ मिमी, रोहा येथे ११० मिमी, खालापूर येथे ८८ मिमी, महाड येथे ७६ मिमी, श्रीवर्धन येथे ६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच अलिबाग, मुरुड, रोहा, श्रीवर्धन, उरण यासारख्या किनारपट्टीवरील भागात अतिवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नद्या- नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर उर्वरित भागातही पावसाची संततधार कायम आहे.
संततधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नागोठणे शहराला पुराचा तडाखा बसला आहे. कोळीवाडा, भाजी मार्केट, एसटी स्टॅण्ड परिसरात पुराचे पाणी शिरले. नागोठणे-रोहा मार्गावरही पुराचे पाणी आले. पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठ परिसरात पुराचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलिबाग, मुरुड आणि पेण तालुक्यांना अतिवृष्टीचा चांगलाच तडाखा बसला आहे. गेल्या दोन दिवसात अलिबाग येथे २५४ मिमी, मुरुड येथे २५७ मिमी, तर पेण १७४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळे सखल भागात पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अलिबागमधील तळकर नगर, रामनाथ, चेंढरे येथील बाफना बाग, रोहीदास नगर, गोंधळपाडा येथील अनेक घरांत पावसाचे पाणी शिरले होते. म्हसळा खाडीत मासेमारीसाठी गेलेले अलिमिया हुसेम वाघनाक, राहणार मजगाव तळा हे शनिवारी रात्रीपासून बेपत्ता आहेत, बोट बुडाल्याने ते वाहून गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरी २३४८ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण जिल्ह्यातील सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत ७५.६५ टक्के आहे.
दरम्यान येत्या २४ तासांत कोकण किनारपट्टीवरील भागात मुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर कोकणातील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains continue in raigad