बुलढाणा: घाटाखालील तालुक्यात झालेल्या पावसाच्या तांडवाच्या नुकसानीची व्याप्ती वाढली आहे. सुधारित अहवालानुसार अतिवृष्टीमुळे २४४ गावांतील ९२ हजार २१३ हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे. तसेच किमान १०० घरात पाणी घुसले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.१८ ते २० जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची नासाडी झाली. कृषी व महसूल विभागाने पाहणी केली. अजूनही हे काम सुरू आहे. शेतात साचलेले पाणी, चिखल गारा, अधूनमधून बरसनारा पाऊस यामुळे सर्वेक्षण वर परिणाम होत आहे. आज सकाळी वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २४४ गावांना फटका बसला. चार तालुक्यातील ९२ हजार २१३ हेक्टरवरील कापूस, सोयाबिन, मका, उडीद, तूर, मुंग पिकांची नासाडी झाली.
शेगाव तालुक्यातील ७७ गावातील ३९ हजार ७२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील ७८ गावांतील १७ हजार ५३७ तर नांदुरा तालुक्यातील ७२ गावांतील ३९ हजार ७२७ हेक्टरवरील पिके बाधित झाली. जळगाव तालुक्यातील १७ गावातील ३९९ हेक्टरवरील पिके बाधित झाली. याशिवाय मलकापूर तालुक्यातील ४ तर नांदुरा मधील ५ हेक्टर जमीन खरडून वा गेली आहे.
हेही वाचा >>>अमरावती: चिखलदऱ्यासाठी शनिवार, रविवारी एकमार्गी वाहतूक; जाण्यास धामणगाव- मोथा, तर येण्यासाठी घटांग मार्ग
दरम्यान अनुराधाबाद, पान्हेरा, देवधाबा, दाताळा, नरवेल गावात मिळून किमान १०० घरात पूर वा पावसाचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांच्या हालास पारावर उरला नाही. अनेक घरांची पडझड झाली आहे. अनुराधाबाद मधील १८ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे