राज्याच्या बहुतांश भागात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून, पुढील दोन दिवसही पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.तीन दिवसांत पडलेल्या पावसामुळे धरणसाठा ४७ टक्क्य़ांवरून ५१ टक्क्य़ांवर पोहोचला. पंचगंगा, कृष्णा, कोयना, मुठा खोऱ्यांतील धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने पश्चिम महाराष्ट्रांतील अनेक गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रात गुजरातपासून केरळपर्यंत किनारपट्टीलगत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा यामुळे सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खडकवासला, पवनेतून पाणी सोडले
पुणे, पिंपरी चिंचवड शहरांना पिण्यासाठी व ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मंगळवारी चांगला पाऊस झाला. खडकवासला, मुळशी, पवना या धरणांमधून पाणी सोडण्याचे प्रमाण वाढवण्यात आले. त्यामुळे पवना, मुळा व मुठा नद्यांची पाणीपातळी वाढली. पाऊस सुरूच असल्याने या धरणांमधून जास्त प्रमाणात पाणी सोडावे लागेल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. या धरणांमधील पाणीपातळी गेल्या तीन दिवसांत ४ टीएमसीने वाढली.

कृष्णा-पंचगंगेच्या काठी इशारा
कोल्हापूर/कराड/वाई :  महाबळेश्वर येथे दिवसभरात १५८ मिलिमीटर पाऊस पडला. कोयना व कृष्णेवरील धरणांमधून पाणी सोडण्यात येत असल्याने सांगलीमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. कोयना धरण ८३.५३ टक्के (८७.९० टीएमसी पाणीसाठी) भरले आहे. कोयनेत पाटण कॉलनीनजीक ९ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी ५ दरवाजे उघडले. त्यामुळे पंचगंगा नदी इशारा पातळीवरून वाहू लागली.

चौदा गावांचा संपर्क तुटला
हिंगोली/नांदेड/परभणी : मराठवाडय़ाच्या बहुतेक भागास मंगळवारीही मुसळधार पावसाने झोडपून काढले.  हिंगोली, नांदेड व परभणी जिल्ह्य़ांत पावसाचा जास्त जोर आहे. हिंगोलीत कयाधू नदीला, तसेच परभणीत पालम तालुक्यातील धोंडी नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
नांदेडमध्ये पुरामुळे वृद्ध महिला वाहून गेल्याचे वृत्त आहे. हिंगोलीत ६० कुटुंबांतील जवळपास ३०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.  

कोकणात पूर; रेल्वेमार्गावरील भराव खचला
रत्नागिरी :  जिल्ह्य़ात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात सर्वत्र नदी-नाल्यांना पूर आले असून महाड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर इत्यादी ठिकाणच्या बाजारपेठांमध्ये गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्य़ात सावित्री, कुंडलिका आणि गांधारी या नद्या दुथडी भरून वाहत असून मंगळवारी दुपारी नागोठण्याच्या बाजारपेठेत पुराचे पाणी घुसले. महाड शहरालाही पुराचा धोका निर्माण झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील कुडाळ तालुक्यात पिटढवळ नदीचे पाणी वाढल्यामुळे दुपारी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद पडली होती. पावसामुळे पोमेंडी-निवसर परिसरात कोंडवी येथे रेल्वे रुळाखालील मातीचा भराव पाण्याच्या दाबामुळे सकाळपासून खचू लागला आहे. तेथे माती टाकून बळकटीकरणाचे काम सुरू आहे.

पावसाचे प्रमाण (मिमीमध्ये)
रत्नागिरी ६२, अलिबाग ३४, डहाणू ७१, पुणे ११.६, नगर ७, सातारा १२, सांगली ८, सोलापूर २३, कोल्हापूर १०, महाबळेश्वर ४९, जळगाव ६०, नाशिक १३, औरंगाबाद ८, परभणी ३७, अकोला ३, अमरावती ९, बुलडाणा २८, ब्रह्मपुरी ३, चंद्रपूर २१, नागपूर ११, वर्धा ४१, यवतमाळ १२.