रायगड जिल्ह्य़ाला आज मुसळधार पावसाने आणि उधाणाच्या पाण्याने झोडपून काढले. यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठय़ा उधाणाने समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरच्या गावांना चांगलाच रुद्र अवतार पाहायला मिळाला.काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्य़ात पावसाने पुन्हा एकदा जोर धरायला सुरुवात केली आहे. जिल्ह्य़ातील बहुतांश भागांत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अलिबाग, पेण, मुरुड परिसरात झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती आज रायगडकरांनी अनुभवली. समुद्राला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी जवळपास ४.९७ मीटरची भरती आली होती. यामुळे समुद्र प्रचंड खवळलेला होता. किनाऱ्यावर महाकाय लाटा येऊन धडकत होत्या. काही हौशी लोकांनी या लाटांचा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मनमुराद आनंद लुटला.
अलिबाग तालुक्यातील माणकुळे परिसरात भरतीमुळे समुद्राचे पाणी शिरले होते. गावात जाणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने संपर्क काही काळ तुटला होता, तर पेण तालुक्यातील भाल परिसरात अपेक्षेप्रमाणे दोन ते तीन ठिकाणी उधाणाचे पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्राला उद्या दुपारीही मोठे उधाण येणार आहे. त्यामुळे बंदिस्तीला गेलेल्या खाडी तातडीने बंद करणे गरजेचे असणार आहे, अन्यथा खाडीचे पाणी शेतात घुसून जमीन नापीक होण्याची भीती आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Story img Loader