रत्नागिरी:  चिपळूणमध्ये गुरुवारी आलेल्या महापुरात अडकलेल्या नागरिकांपैकी सुमारे दीड हजार नागरिकांची शुक्रवारी दिवसभरात सुटका करण्यात आली. मात्र अजूनही काही ठिकाणी नागरिक अडकले असण्याची  आहे.

महापुराचे पाणी चिपळूण शहरात गुरुवारी पहाटेपासून शिरू लागले.  दुपारपर्यंत शहराचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याखाली गेला.  पूर्वानुभवानुसार नागरिकांनी पहिल्या मजल्यापर्यंत सर्व साहित्य हलवले होते. मात्र पाणी दुसऱ्या मजल्यापर्यंत पोचल्याने भयावह स्थिती निर्माण झाली.  या परिस्थितीचा अंदाज न आल्यामुळे असंख्य नागरिक आपापल्या घरात किंवा दुकानांमध्ये अडकून पडले होते.

नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या तुकड्या मागवण्यात आल्या. पण पुण्याहून त्या चिपळूणमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दाखल झाल्या. त्यामुळे बचाव कार्य शुक्रवारी सकाळी सुरू झाले. हवाई दल आणि रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचीही मदत  उपलब्ध झाल्याने या कामाला जास्त वेग आला. दिवसभरात शहराच्या विविध भागांमधून सुमारे दीड हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. त्यापैकी निवाऱ्याची काहीच सोय नसलेल्या १५५ जणांची चिपळूणमध्ये, तर आणखी १५० जणांची खेडमध्ये व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच सुमारे ५ हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.

शहरातील पाणी शुक्रवारी सकाळी ओसरायला लागल्यानंतर पुरातून वाहून आलेले साहित्य आणि चिखल, राडारोडा सर्वत्र पसरला आहे. काही ठिकाणी तो साफ करण्याचे काम सुरू झाले आहे.

पुराचे पाणी ओसरले तरी धरणक्षेत्रात पाऊ स पडत असल्यामुळे पुन्हा चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सखल भागात व पूर प्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारा स्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

अजूनही संपर्क तुटलेल्या भागातील नागरिकांच्या मदतीसाठी वायूदल व नौदलाच्या सहाय्याने मदत कार्य करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी हे काम पुढे चालू राहणार आहे.

Story img Loader