अलिबाग – अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीमुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती मार्ग, आणि जुना मुंबई पुणे महामार्गावरून नवी मुंबईत येणाऱ्या अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत हे बंदी आदेश लागू असणार आहेत.
नवी मुंबई वाहतूक निंयत्रण विभागाकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या उलवे येथे शिवडी न्हावा शेवा अटल सेतूचा भव्य लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. त्यामुळे नवीमुंबई, पनवेल आणि उरण परसरातील वाहतुकीवरचा ताण वाढणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच या परिसरातील वाहतूक नियमन सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने नवी मुंबई परिसरातील सर्व रस्त्यांवर अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा – फडणवीस यांच्या कार्यक्रमात लाभार्थ्यांच्या साहित्याची पळवापळवी
मुंबई गोवा महामार्गासह, मुंबई पुणे दृतगती महामार्ग आणि मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (जुना महामार्ग) यावरून अवजड वाहने नवी मुंबई मार्गे मुंबई आणि ठाण्यात जात असतात. तर ठाणे मुंबईतून येणारी अवजड वाहने नवीमुंबई मार्गे पुणे, गोव्याच्या दिशेने जात असतात. हीबाब लक्षात घेऊन शुक्रवारी सकाळी सहा वाजेपासून नवीमुंबई परिसरात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. जिवनावश्यक वस्तू आणि प्रवाश्यांची वाहतूक करणाऱ्या बसेस वगळता सर्व अवजड वाहनांना हे आदेश लागू असणार आहेत. नवी मंबईच्या पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.