अलिबाग : मुंबई – गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान रविवारी (दि. १६) अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. या बाबतची वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आले आहे.
होळी व धुळीवंदन सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासीय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आपल्या मुळ गावी आले आहेत. त्याचबरोबर शनिवार व रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येनी कोकणात दाखल झाले आहेत. हे सर्वजण रविवारी ( दि .१६) परतणार आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढून वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून माणगाव परिसरात वाहतूक कोंडी समस्या उद्भवत होती. त्यामुळे वाहतूक नियमन करणे अवघड होत होते. हीबाब लक्षात रविवारी महामार्गावरील वाहतूक नियंत्रित केली जाणार आहे. कोणत्याही प्रकारे अपघात घडू नये, वाहतूककोंडी होऊ नये यासाठी १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजल्यापासुन रात्री १२ वाजेपर्यंत मुंबई – गोवा महामार्गवर पोलादपूर तालुक्यातील कशेडी व पेण तालुक्यातील खारपाडा या दरम्यान अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
त्याचबरोबर खोपोली वरून वाकणकडे येणाऱ्या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, अग्निशमन वाहने, रुग्णवाहीका या वाहनांची वाहतूक सुरू राहील असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.