अलिबाग – मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कोकणात गणेशोत्सवासाठी निघालेल्या चाकर मान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. महामार्ग बऱ्या पैकी सुस्थितीत आणण्यात शासनाला यश आले असले तरी वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका झालेली दिसत नाही.
काल रात्री पासूनच महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे आमटेम ते नागोठणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटेच्या सुमारास कोंडी कमी झाली . सकाळच्या सुमारास वाकण फाटा ते सुकेळी खिंड या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या तीन रांगा लागल्याने पुढे एकेरी वाहतूक करताना पोलीस प्रयत्नांची शिकस्त करीत होते. या ठिकाणी दिवसभर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
हेही वाचा >>> सातारा: कुंडली पाहून राष्ट्रीय फुटबॉल संघ निवड करणाऱ्या प्रशिक्षक स्टीमक यांना बडतर्फ करा, महाराष्ट्र अनिसची मागणी
इंदापूर भागातही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. कोकणात जाणारी वाहने दोन्ही लेनवर आल्याने दोन्ही बाजूची वाहने अडकून पडली होती. इंदापूर बाजार पेठेतून वाहने अगदी कासव गतीने पुढे सरकत होती. इंदापूरच्या अलीकडे ५ ते ६ किलो मिटर पर्यंत रांगा लागल्या होत्या आणि वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाली होती. त्यामुळे कोलाड नाक्यावरून वाहने विळे भागाड मार्गे माणगाव किंवा रायगड कडे वळवण्यात येत होती.
माणगाव बाजारपेठ येथेही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना चाकर मान्याना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडी मुळे महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाल्याचे पाहायला मिळाले. माणगाव आणि इंदापूर येथे बाह्य वळण रस्त्यांची कामे रखडली आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी रस्ता अरुंद आहे. या दोन्ही ठिकाणी महामार्ग हा मुख्य बाजारपेठेतून जात असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे प्रयत्न करूनही वाहनांची संख्या वाढल्याने इथे वाहतूक कोंडी होत आहे.