वाई: मेघगर्जनेसह जोराच्या सोसाट्याच्या वाऱ्यासह सातारा वाई महाबळेश्वर पाचगणी ,वाठार स्टेशन,येथे दुपारी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली. महाबळेश्वर, पाचगणी भागात मुसळधार अवकाळी पाऊसाने हजेरी लावली. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा

सातारा महाबळेश्वर, पाचगणी वाई भागात मुसळधार अवकाळी पाऊस झाला. हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात पुढील तीन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. दुपार पासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर या भागात पावसाचा सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे महाबळेश्वरच्या  पाचगणी वाईच्या बाजारपेठेत पाणीच पाणी झाले आहे. साताऱ्यातही मुसळधार पाऊस झाला. या अवकाळी पावसाचा  स्ट्रॉबेरी पिकाला मात्र  मोठा फटका बसणार आहे.

आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली.

शुक्रवारी सकाळपासूनच उन्हाचा चांगलाच तडाखा जाणवत होता.दुपारी तीन नंतर आकाशात काळ्या ढगांची दाटी होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात मोठा बदल झाला  बालचमुनी या पावसात भिजण्याचा आनंद तर लुटलाच तर अनेक मुख्य रस्ते निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले . अचानक आलेल्या पावसाने वाहनचालक बाजारातील ग्राहक विक्रेते आणि शेतकऱ्यांची धावपळ झाली. अनेकांनी धावत पळत या पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधला . जोराचा वारा  विजांचा कडकडाटात अनेक ठिकाणी वीज पुरवठाही खंडित झाला होता.  या अवकाळी पावसाने सातारकर सुखावून गेले. महाबळेश्वर पाचगणी येथे पर्यटक ही पावसामुळे सुखावले. अनेकाने पावसात भिजण्याचा आनंद घेतला.आज सातारा,वाई, पाचगणी,महाबळेश्वर,जावळी,मांढरदेव,वाठार, लोणंद या परिसरात जोरदार पाऊस झाला.या पावसाने हवेत चांगलाच गारवा आला होता.

 या पावसाने  शेतात काढणीला आलेला भुईमूग उन्हाळी ज्वारी, गहू पिके तसेच आंब्याच्या भागातील लगडलेल्या कैऱ्यांवर या पावसाचा मोठा परिणाम होऊन जोराच्या वाऱ्यामुळे अनेक आंबा उत्पादकांना हा पाऊस नकोसा ठरला .

वाऱ्यामुळे शेकडो कैऱ्या झाडाखाली पडल्याचा नजारा पाहून याचा परिणाम हंगामातील आंबा उत्पादनावर होणार यामुळे आंबा उत्पादक शेतकरी नाराज झाल्याचे दिसून येत आहे. या पावसामुळे झोडणीला आलेल्या चिंचांचे रंग बदलल्याने चिंचांचे दर घसरणार आहेत. त्याचप्रमाणे वाढत्या किमतीच्या फळभाज्या आणि पालेभाज्यांवरही या पावसाचा परिणाम होइल.  या पावसामुळे सातारा शहरातील राधिका रोड, राजवाडा परिसर, पालिका कार्यालय चौकात तळ्याचे स्वरूप येऊन पाण्याची डबकी साचल्याचे चित्र दिसत होते. मागील काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील पाचवड , आने वाडी ,महाबळेश्वर, वाई या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.