सांगली : ऐन दिवाळीच्या तोंडावर जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी, व्यापारी आणि दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडणार्या ग्राहकांची दैना उडाली. महापालिकेने सांगली, मिरज व कुपवाड शहरात पथविके्रत्यांसाठी सुरू केलेल्या रांगोळीपासून अंघोळीपर्यंतच्या दिवाळी बाजारात तर गुडघाभर पाणी साचल्याने छोट्या व्यापार्यांच ेलाखो रूपयांचे नुकसान झाले.
आज सकाळपासून तासगाव, पलूस, शिराळा, इस्लामपूर परिसरात पावसाचे आगमन झाले होते. ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसाने उसतोडी तर लांबल्या आहेतच, पण काढणीला आलेल्या देशी ज्वारीच्या कणसाचे दाणेही खराब झाले आहेत. द्राक्ष बागामध्ये फळछाटणीची कामे संपत आली असून अनेक बागा कळी ते फुलोरा अवस्थेत आहेत. आजच्या अवकाळी पावसाने कोवळ्या द्राक्ष घडामध्ये पाणी साचले असून यामुळे दावण्या व भुरी या बुरशीजन्य रोगांना बळी पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाने शाळूसह गहू, हरभरा, करडई या रब्बी पिकाला जीवदान मिळाले असले तरी अन्य पिकांना नुकसानकारक ठरणारा आहे.
हेही वाचा >>>वस्रोद्योग अडचणीत असताना कामगारांना १२ टक्के बोनस
सांगली, मिरज शहरात सकाळी अकरा वाजलेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत पाउस पडत होता. यामुळे सर्वच रस्त्यांना ओंढ्यानाल्याचे स्वरूप आले होते. सांगलीतील राजवाडा चौक, स्टेशन रोड, मिरजेतील तांदूळ मार्केट, स्टेशन रोडवर दोन फुटांनी पाणी वाहत होते.महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पथविक्रेत्यांसाठी सांगलीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण, मिरज हायस्कूल याठिकाणी सशुल्क स्टॉल मांडून दिले आहेत. रांगोळी पासून साबन, उटणे, खाद्य पदार्थ, कपडे, फटाके, दिवाळीचे साहित्य एकाच ठिकाणी मिळावी अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अस्थायी स्वरूपाचे कापडी शामियाने उभारण्यात आल्याने पावसाने या दिवाळी बाजाराची धूळधाण केली. पावसाने छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.