लाडकी बहिण योजना आणि महिला सशक्तीकरण अभियान आंतर्गत रायगड जिल्ह्याचा मुख्य सोहळा बुधवारी मोर्बा येथे पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सह, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विवीध भागातून हजारो महिला येणार असल्याने, माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ वर अवजड वाहतूकीस बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

०९ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. १६ टन क्षमतेची किंवा त्याहून अधिक वजनाच्या वाहनांसाठी हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. मात्र त्याच वेळी जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्यास मुभा असणार आहे.

हेही वाचा >>> Uddhav Thackeray : “भाजपाचे घोटाळे इतके मोठे आहेत की ७० हजार कोटींचा घोटाळा लाजून म्हणतो मी तर..”, उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

यावेळी अवजड वाहनांना १) म्हसळा मांदाड तळामार्गे रोहा नागोठणे, २) म्हसळा साई- तळेगाव तळा – इंदापुर व ३) म्हसळा साई चेकपोस्ट कनघर खामगाव- पुरार फाटा- गोरेगाव मार्गे वळवली जाणार आहेत. ही वाहतूक बंदी अधिसूचना ही दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही असेही जिल्हाधिकारी आदेशात नमूद करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाकरीता ८०० ते ९०० बसेस व इतर लहान मोठी अशी वाहने येण्याची शक्यता आहे.  हा कार्यक्रम मोर्बा, ता. माणगांव गावचे हद्दीत रोडजवळील मैदानावर माणगाव ते दिघी येथे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (एफ) च्या बाजूला असणाऱ्या मैदानावर होणार आहे.

हेही वाचा >>> रत्नागिरी शहर स्मार्ट सिटी करण्याबरोबर ग्रामिण भागाचा देखील विकास होणार

या रोडवर जड-अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी या मार्गावरुन जड-अवजड वाहतूक सुरु राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होवून कार्यक्रमाच्या वेळी गंभीर प्रश्न उद्भवू शकतो. महामार्गावर अपघात होवू नये तसेच कार्यक्रमाकरीता येणारे नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे तसेच महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाचे अनुषंगाने जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दि. ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ६.०० ते सायं. १७.०० वाजेपर्यत रायगड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ (एफ) यावर म्हसळा ते माणगाव वरुन होणारी ट्रेलर, कंटेनर, ट्रक/डंपर व इतर सर्व अशी अवजड वाहने ज्याची क्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे अशा सर्व जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे.