हेल्मेट वापरणे योग्य असून, त्याने माणसाचा जीव वाचतो, हे मला मान्य आहे. पण त्याची सक्ती नको. कोणतीही सुविधा न देता हेल्मेट सक्ती नागरिकांच्या हितासाठी आहे की हेल्मेट उत्पादकांच्या फायद्यासाठी आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी आज केला. मनसे कसबा विभागाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पूर्वी हेल्मेट सक्तीला विरोध करणारेच आता हेल्मेट सक्ती करीत आहेत. हे सत्तेचे शहाणपण आहे, असा टोला लगावत पुण्यात लागू करण्यात आलेली हेल्मेटसक्ती ही कंपन्यांच्या फायद्यासाठीच असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. हेल्मेट सक्ती करण्याआधी रस्ते नीट करण्याची सक्ती का नाही? असा सवालही राज यांनी यावेळी केला. रस्त्यांवर खड्डे आहेत, अनेक ठिकाणी डिव्हायडर नाहीत. रस्त्यावर आधी योग्य सुविधा द्या, या शब्दात त्यांनी सुनावले.