हेक्टरी ५० हजार रुपयांच्या मदतीची मागणी करीत होतो, तेव्हा कोविडचे संकट नव्हते आणि हक्काच्या जीएसटीची रक्कमही आताप्रमाणे तुंबलेली नव्हती. सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करणारांपैकी मी नाही. निर्णय जाहीर करायचा आणि तो मागे घ्यायचा हा आपला स्वभाव नाही. जे करू, ते ठोस करू. पुढील दोन दिवसांत सर्वतोपरी मदत करणार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आणि खडसे प्रवेशाच्या निर्णयावरून पायाचे दगड का निसटताहेत, असा प्रश्न उपस्थित करत टोला लगावला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले होते. नुकसानीच्या पाहणीनंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, इकडे अतिवृष्टी सुरू असताना आपण प्रत्येक क्षणाची माहिती घेत होतो. झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळेच शेतक ऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण स्वत: आलो आहोत. मदत किती, कशी आणि केव्हा करावयाची? याबाबत मुंबईमध्ये प्रत्यक्ष काम सुरू आहे. आणखी काही ठिकाणचे पंचनामे पूर्ण होणे बाकी आहे. तोवर ज्यांची जनावरे दगावली, ज्या घरात अतिवृष्टीमुळे मृत्यू झाले, त्यापैकी काही जणांना प्रातिनिधिक मदत केली आहे. दसरा दिवाळीच्या तोंडावर राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी आपण पाहू शकणार नाही.
कोविडमुळे सध्या अर्थकारण पूर्णत: मोडकळीस आले आहे. हक्काचे जीएसटीचे पैसे केंद्राकडे थकले आहेत. ते मिळाले असते तर तेलंगणा राज्याप्रमाणे आपणही तात्काळ मदत जाहीर केली असती, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पायाचे दगड का निसटताहेत?
प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात भाजपची मुळे रुजविली आहेत. अत्यंत स्पष्टवक्तेपणा असलेले खडसे अभ्यासू आहेत. त्यांचे महाविकास आघाडी परिवारात स्वागत आहे. मात्र जुन्या मित्राच्या काळजीपोटी काही प्रश्न उपस्थित होतात. एकीकडे यशाची शिखरे पादाक्रांत करीत असताना पायाचे दगड का निसटून जात आहेत, याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता उद्धव यांनी टोला लगावला.