Actor-Director Hemant Dhome Opposes Hindi as Third Language in Maharashtra Primary Schools : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एससीईआरटीने नुकताच ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४’ तयार केला आहे, जो सुरू होत असलेल्या शैक्षणिक वर्षापासून लागू केला जाणार आहे. यानुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकणं सक्तीचं करण्यात आलं आहे. तर, अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा शिकाव्या लागतील. राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेसह (ठाकरे) अनेक पक्षांनी या निर्णयास विरोध केला आहे. मात्र, मराठी कलाकारांकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. अशातच लोकप्रिय अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे याने मात्र ठाम भूमिका घेतली आहे. आपला देश एका भाषेच्या आहारी का देताय? हिंदी आमच्या माथी का मारताय? असा प्रश्न ढोमे याने राज्य सरकारसमोर उपस्थित केला आहे. तसेच, राज्य सरकारचा हा निर्णय मुळावरच घाव घालणारा आहे, असंही ढोमे म्हणाला.
हेमंत ढोमे काय म्हणाला?
हेमंतने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की
भारत, एक संघराज्य! राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं. म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार असतं! त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे! विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय?
“सर्वांना आपली भाषा जपूद्या”
अभिनेता हेमंत ढोमे याने म्हटलं आहे की सर्वांनाच आपली भाषा जपूद्या, प्रत्येकाला आपली संस्कृती वाढवूद्या. परंतु, सध्या मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे! हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका आणि आहेच की ती शिकायला, येतेच आहे की व्यवहारापुरती, मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे, येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा-खांद्यावर खेळली पाहिजे. त्यासाठी कष्टं करा!