शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. आर. वाकोडे यांना शौचालय साफसफाई करायला लावणारे हिंगोलीचे शिवसेना ( शिंदे गट ) खासदार हेमंत पाटील यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी तसेच इतर कायद्यांखाली बुधवारी, ४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला. यानंतर विविध संघटनांनी हेमंत पाटील यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर आता हेमंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हेमंत पाटील म्हणाले, “गेल्या दोन दिवसांत अनेकांचा मृत्यू रूग्णालयात झाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून अधिष्ठातांना भेटून चर्चा केली. नंतर रूग्णालयातील शौचालयात दुर्गंधी आणि घाण साचली होती. यावेळी अधिष्ठातांना म्हटलं की, २ ऑक्टोबर गांधी जयंतीला पंतप्रधान मोदींनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. आपण शौचालय साफ करू. मी स्वत:हा पाणी टाकून शौचालय साफ केलं.”
हेही वाचा : “तपास यंत्रणांच्या भीतीनं अजित पवार गट भाजपाबरोबर”, शरद पवारांच्या विधानाला फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
“यात अधिष्ठातांना कुठेही आरेतुरे किंवा जातीवाचक शिवीगाळ केली नाही. जात विचारण्याचा प्रश्नच येत नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न विचारल्यानं अॅट्रोसिटी गुन्हा दाखल होत असेल, तर गंभीर बाब आहे. मृत्यूंवर कोणतीही चर्चा होत नाही. कुठलीही संघटना आंदोलन करत नाही,” अशी खंत हेमंत पाटील यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : “…आणि मुख्यमंत्री स्वत: दिल्लीला पळाले”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला!
“रात्री ३ वाजता गुन्हा दाखल होत, असेल तर १०० टक्के राजकारण आहे. मी शिवीगाळ केली, जातीवाचक बोललो तर १०० टक्के गुन्हा दाखल करा. पण, जातीवाचक बोललो नसताना अॅट्रोसिटी दाखल होणं चुकीचं आहे,” असं हेमंत पाटील यांनी म्हटलं.