Hemlata Patil : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. विधानसभेतील पराभवानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडीची चर्चा रंगली आहे. कारण महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोप करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना ठाकरे गट आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत संजय राऊत यांनी दिले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय चाललंय? याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. यातच आता काँग्रेसला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील या काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या चर्चांवर डॉ.हेमलता पाटील यांनी प्रतिक्रिया देत पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. “मी काँग्रेस पक्षात नाराज असून माझी काँग्रेसमध्ये राहण्याची इच्छा नाही”, अशी प्रतिक्रिया डॉ.हेमलता पाटील यांनी दिली आहे. त्या टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होत्या.
डॉ.हेमलता पाटील काय म्हणाल्या?
“गेल्या ३० वर्षांपासून मी नाशिक महापालिकेत काँग्रेसची नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. तसेच प्रदेशाचं प्रवक्ते म्हणूनही मी काम करत आहे. १९९६ मध्ये मला जेव्हा इच्छा नव्हती तेव्हा महापौर पदासाठी मला गळ घातली. मात्र, तेव्हा परिस्थिती वेगळी होती आणि काँग्रेसच्या एका मतामुळे माझं महापौर पद हुकलं. त्यानंतर महिलांसाठी आरक्षण होतं तेव्हाही मला संधी मिळाली नाही. तरीही मी पक्षावर कोणताही राग न धरता पक्षाचे काम करत राहिले. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी इच्छा नसताना मला निवडणूक लढवायला सांगितलं. तेव्हा मला ५० हजार मते मिळाली. त्यानंतर आता यावेळी विधानसभेची निवडणूक मला लढवायची होती. काँग्रेसच्या नेतृत्वाकडूनही सांगण्यात आलं होतं की आम्ही ही जागा सोडणार नाही. मात्र, नंतर ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली. त्यामुळे मला फसवलं गेल्याची भावना निर्माण झाली”, असं डॉ.हेमलता पाटील यांनी म्हटलं आहे.
पुढील भूमिका काय असेल?
“मी काँग्रेस पक्षात नाराज आहे. तसेच माझी काँग्रेस पक्षात राहण्याची इच्छा नाही. एवढे वर्ष काम करूनही आपण जर लोकांचे प्रश्न सोडवू शकत नाहीत, जर पक्ष आपल्याला नेहमी गृहीत धरत असेल तर मग त्या पक्षात कशाला राहायचं? आता ज्या पक्षाला असं वाटेल की मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेन आणि जो पक्ष मला काम करण्याची संधी देईल, त्या पक्षात मी प्रवेश करणार आहे. मात्र, मी आधी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे”, अशी प्रतिक्रिया डॉ.हेमलता पाटील दिली आहे.