कराड: हिंदु एकता आंदोलन संघटनेतर्फे शिवजयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे निघालेल्या दरबार मिरवणुकीत शिवप्रेमी जनतेने उच्चांकी सहभाग दर्शवला. शिवजयंतीची सर्वाधिक मोठी शिवशाही दरबार मिरवणूक असा नावलौकीक असलेल्या या शिवोत्सवात बुधवारी सायंकाळी बालचमूंसह शिवप्रेमी, युवक, युवती, महिला व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजीमहाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छ्त्रपती संभाजीमहाराज की जय, येळकोट येळकोट जय मल्हार, जय श्रीराम’ आदी जयघोषणांनी कराडनगरी दुमदुमन गेली .
नियोजबद्ध मिरवणुक
शिवजयंतीच्या दरबार मिरवणुकीस शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील पांढरीचा मारुती मंदिराजवळ भगव्या ध्वजाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून प्रारंभ करण्यात आला. भाजप नेते डॉ. अतुल भोसले, ‘हिंदू एकता’चे विनायक पावसकर, विक्रम पावसकर आदी मान्यवरांसह हिंदुत्ववादी संघटना, सर्वपक्षीय, तसेच विविध संघटना व सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त व कराड परिसरातील नागरिक सहभागी होते. यावेळी भगवे झेंडे, पताका, भगव्या टोप्या व फेटे परिधान केलेले शिवप्रेमी नागरिक, पारंपारिक ढोलताशा व तुतारीच्या गजरासह शिवरायांच्या जयघोषांनी परिसर शिवमय झाला होता. दरबार मिरवणुकीच्या प्रारंभी भगवाधारी अश्व, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली पालखी, शस्त्रपथक, पारंपरिक ढोलताशा पथक, बँड पथक, लेझीम पथक, हलगी पथक दांडपट्टा पथक, पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला, युवक, युवती नागरिक, तसेच प्रभू श्रीराम आणि हनुमान यांची भव्य मूर्ती, त्याचबरोबर विविध शाळा व महाविद्यालयांनी सादर केलेले देखावे अशी सुरेख नियोजन झालेली भव्य मिरवणुक होती.
हेही वाचा >>>“सनातन ही दहशतवादी संस्था, बंदीची मागणी मी..”, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
मुख्य बाजारपेठेतून मार्गक्रमण
पांढरीचा मारुती मंदिरापासून नागोबा कॉर्नर, जोतिबा मंदिर, कन्या शाळा, कमानी मारुती चौक, चावडी चौक, मुख्य पेठलाईन मार्गे नेहरू चौक, आझाद चौक ते शिवतीर्थ दत्त चौक असा या दरबार मिरवणुकीचा मार्ग होता. रस्त्याच्या दुतर्फा मिरवणुकीच्या स्वागतासाठी एकच गर्दी राहिली होती. रात्री साडेनऊ वाजता शिवतीर्थ दत्त चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर दरबार मिरवणुक विसावली. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना संबोधित केले.
देखाव्यांनी लक्ष वेधले
जय भारत गणेश मंडळ (शुक्रवार पेठ), ओम गणेश मंडळ (आयवा चौक), येथे शिवरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व सजावटी, पावसकर गल्लीत रायगडावरील मेघ डंबरीची प्रतिकृती, कमानी मारुती मंडळाची आकर्षक सजावट, भगवा रक्षक ग्रुपचा पावनखिंडचा रणसंग्राम हा देखावा, श्रीरामाच्या मोठा फलक व राम मंदिराची प्रतिकृती, मारुती चौक गणेश मंडळांची शिवराय व विठ्ठलाची प्रतिकृती, पाटण कॉलनीत श्री शिवाजी गणेश क्रीडा मंडळाची ४० फुटी आकर्षक कमान आदींनी लोकांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा >>>नकली शिवसेनेकडून मला जिवंत गाडण्याची भाषा; पंतप्रधान मोदी यांची उद्धव ठाकरेंवर टीका
पारंपारिक वेशभूषा
शिवशाही दरबार मिरवणुकीत ढोलताशा, तुतारी, दांडपट्टा, बँड पथक आदी पारंपारिक वाद्यांचा गजर सूरू होता. तसेच भगवा फेटा परिधान करून पारंपारिक वेशभूषा केलेल्या युवती व महिला मिरवणुकीत सहभागी झाल्याने या मिरवणुकीची शोभा वाढल्याचे या वेळी दिसून आले.
शिवबा व जिजाऊंचे खास आकर्षण
मिरवणुकीत अश्वारूढ छत्रपती श्री शिवाजी महाराज, बाल शिवाजी, जिजामाता, शंभूराजे, तसेच मावळ्यांच्या वेशभूषा धारण केलेले कलाकार सहभागी झाले होते. त्यात बाल शिवबा व आऊ जिजाऊंचे मिरवणुकीत खास आकर्षण ठरले होते. तसेच बग्गीमध्ये आसनस्थ झालेले शिवाजीमहाराज, बाल शिवाजी, जिजामाता पाहण्यासाठी आणि त्यांच्या सोबत छायाचित्र काढण्यासाठी बालचमूंनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.
युवती, महिलांचा लक्षवेधी सहभाग
दरबार मिरवणुकीत महिला युवती मोठ्या संख्येने युवती व महिलांचा सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी पारंपारिक वेशभूषा करून भगवा फेटा परिधान केला होता.
डॉल्बीवर तरुणाईचा ठेका
भव्य-दिव्य मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर तरुणाईन ठेका धरल्याचे दिसून आले. मिरवणुकीत कराड शहरासह मलकापूर, विद्यानगरसह कराड तालुक्यातून युवावर्ग सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजीचा गजर केला.