मागील आठवडाभरात पडलेला अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु गेल्या चार दिवसांपासून उन्हाचा पारा चक्क ४० अंशांवर जाऊन ठेपला. मागील दोन दिवसांत तर सूर्यनारायण आग ओकत असून पारा ४३ अंशांवर गेला आहे. उन्हाच्या कडाक्याने शहरातील रस्ते दुपारनंतर ओस पडू लागले आहेत. शेतकरीवर्गही मशागतीची कामे भल्या पहाटे आणि दुपारनंतर करू लागले आहेत.
मागील आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पाऊस झाला. ढगाळ वातावरणामुळे मागील आठवडय़ात चार-पाच दिवस उन्हापासून काहीअंशी दिलासा मिळाला. मागील १५ दिवसांपूर्वी पारा ४१ अंशावर गेला होता. मात्र, मागील सलग ४ दिवसांपासून पारा ४१ ते ४३ अंशांवर कायम आहे. सकाळी दहानंतर उन्हाच्या कडाक्याने अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे दुपारी बारानंतर शहरातील मुख्य रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामात मग्न आहेत. लग्नसराईनंतर कडक उन्हाच्या बचावासाठी शेतकरीवर्ग भल्या पहाटेस उठून शेतीची मशागतीची कामे करीत आहेत. कडक उन्हापासून बचावासाठी झाडाखाली विश्रांती घेऊन सायंकाळनंतर पुन्हा उरलेली कामे उरकली जात आहेत. शहरी भागात घरातून निघताना तोंडाला ओला रूमाल बांधून उन्हापासून बचाव सुरू आहे. महिलावर्ग तोंडाला स्कार्प बांधून कडक उन्हापासून सुटका करून घेताना दिसतो.
रसवंती, ज्यूस सेंटरवर गर्दी
अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हात फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यालगत ठिकठिकाणी असलेल्या ज्यूस सेंटर व रसवंतीगृहावर गर्दी होत आहे. रस व विविध फळांचा रस पिल्याने नागरिकांना उन्हाच्या उष्णतेपासून काहीअंशी दिलासा मिळत आहे.
असह्य़ उष्म्याच्या त्रासामुळे रुग्णालयांमध्ये वाढती गर्दी
वार्ताहर, लातूर
गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान टिपेला पोहोचल्यामुळे लातूरकरांना भाजून काढणाऱ्या उन्हाचा अनुभव येत आहे. असह्य़ उष्म्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे.
अवकाळी पावसामुळे पाऱ्यात चांगलाच चढ-उतार होत होता. कृतिका नक्षत्राच्या पहिल्या चरणात अवकाळी पावसाने जोर धरल्यामुळे वातावरणातील उकाडा कमी झाला होता. मात्र, दुसऱ्या चरणात एकाएकी तापमान वाढले. सकाळी आठ वाजतादेखील उन्हाचा कडाका सहन करणे त्रासदायक ठरू लागले आहे. घरातून बाहेर पडतानाच चेहरा व डोक्याला कपडा बांधण्याची खबरदारी घेतली जात आहे. उन्हामुळे नाकातून रक्त येण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. डोक्यावर उन्हाचा मारा तीव्र झाल्यानंतर हा त्रास होतो. टोपीखाली कांदा फोडून ठेवणे किंवा डोक्याला कपडा भिजवून बांधणे, असे उपाय यावर केले जात आहेत. बाजारात दिवसभर चांगलाच शुकशुकाट आहे. सायंकाळनंतरच बाजारात गर्दी दिसून येत आहे. उन्हाच्या त्रासामुळे बाहेर जाता येईना व घरात उकाडय़ाचा त्रास सहन होईना, अशी स्थिती तयार झाली आहे. घरात कुलर असला, तरी त्यात घालायला पाणी नसल्यामुळे सर्वाची कुचंबणा होते. लहान मुलांच्या अंगावर पुरळ येणे, चक्कर येणे, हाता-पायाला गोळे येणे असे प्रकार घडत असल्यामुळे दवाखान्यात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. फळांचा व उसाचा रस, िलबू शरबत यांची विक्रीही मोठय़ा प्रमाणात होत आहे. शहरातील सर्वोपचार रुग्णालयात उन्हाळी लागलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. ताप-उलटी-जुलाब होण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. उन्हाळय़ात जास्त घाम आल्याने शरीरातील सोडियम व पोटॅशियमचे प्रमाण कमी होते. त्यामुळे अधिकाधिक पाणी प्यावे, हा आवश्यक उपाय असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या वर्षी पाऊस लवकर दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र, किमान १५ दिवस उन्हाच्या कडाक्याच्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

Story img Loader