अनेकांची नावे चर्चेत असली तरी अचानक जालना लोकसभा मतदारसंघासाठी आम आदमी पार्टीकडून दिलीप म्हस्के यांचे नाव गुरुवारी जाहीर झाले. त्यानंतर अनेकांनी दिलीप म्हस्के यांच्यासंदर्भात चौकशी केली. शुक्रवारी आम आदमी पार्टीचे जिल्हा समन्वयक कैलास फुलारी यांनी पत्रकार बैठक घेऊन दिलीप म्हस्के यांच्यासंदर्भात माहिती दिली.
फुलारी म्हणाले की, दिलीप म्हस्के सध्या न्यू जर्सी येथे असून येत्या आठवडय़ात भारतात येणार आहेत. जालना तालुक्यातील भाटेपुरी येथील ते मूळ रहिवासी आहेत. मुंबई येथे विधी शाखेची पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर तेथेच त्यांनी एम.फिल पूर्ण केले. त्यानंतर न्यू जर्सी येथे त्यांनी ‘पोलिटिकल सायन्स अँड प्रॅक्टीस’ या विषयात डॉक्टरेट मिळविली. ३४ वर्षे वयाचे दिलीप म्हस्के सध्या न्यू जर्सी येथे मानसिक रुग्णांचे समुपदेशन करतात. त्याचप्रमाणे भारतातही त्यांचे येणे-जाणे असते. मुंबई येथे आलेल्या पुराच्या वेळी तसेच जालना जिल्ह्य़ातील स्वाईन फ्ल्यू साथीच्या वेळी त्यांनी मदतीचे काम केलेले आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. खैरलांजी प्रकरणी आंतरराष्ट्रीय पातळीवर आवाज उठविण्याचे काम त्यांनी केले. दादासाहेब गायकवाड जमीन सबलीकरण योजनेअंतर्गत राज्यातील भूमिहिनांना जमीन मिळावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, असेही फुलारी म्हणाले. या पत्रकार बैठकीच्या वेळी दिलीप म्हस्के यांचे बंधू राजेंद्र त्याचप्रमाणे आई चंपाबाई आणि वडील दत्तात्रय यांची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा