व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थिनींचा अल्प प्रतिसाद
शिक्षण ही सामान्य माणसाची मूलभूत गरज झाली असून अधिकाधिक संख्येने उच्च शिक्षण कसे घेता येईल, याकडे विद्यार्थी लक्ष लावून असतो. महत्त्वाचे म्हणजे उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढत आहे. त्यात मुलींची संख्याही लक्षणीय आहे. परंतु व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थिनींचा ओघ कमी आहे.
पायाभूत सुविधांच्या अभावामुळे नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये बंद करण्यात येत असली तरी देश पातळीवर मात्र, महाविद्यालयांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी नवीन ९०३ महाविद्यालये सुरू झाली. विद्यापीठ अनुदान आयोग उच्च शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळी आकडेवारी नेहमीच गोळा करीत असतो. त्यांत नवीन महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणात घेतलेली झेप याचीही दखल घेण्यात येते. आश्चर्य म्हणजे, सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात सुरू झाली असून त्याच्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे.
देश स्वतंत्र झाला तेव्हा देशभर केवळ २० विद्यापीठे आणि ५०० महाविद्यालये होती, तर केवळ २.१ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण घेत होते. मार्च २०१७पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिलेली ७९५ विद्यापीठे आहेत. त्यात ४७ केंद्रीय, राज्यातील ३६० सार्वजनिक विद्यापीठे, राज्यातील २६२ खासगी विद्यापीठे, १२३ अभिमत विद्यापीठे आणि ४२,३३८ महाविद्यालये आहेत. गेल्या वर्षी मार्चअखेर त्यांत ९०३ महाविद्यालयांची भर पडली आहे. २०१५-१६मध्ये ४१,४३५ तर २०१६-१७मध्ये ४२,३३८ महाविद्यालयांची भर पडली आहे. महत्त्वाचे म्हणजे, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिनियम १९५६ नुसार २(एफ)नुसार नोंदणी झालेली १०,९६६ महाविद्यालये आहेत. त्यातील सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात (२३९८) आहेत, तर त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा (१३७३) क्रमांक लागतो. त्यानंतर कर्नाटक (९६५), तमिळनाडू (५७०) आणि गुजरात (५४२) या राज्यांचा क्रमांक आहे.
२०१६-१७मध्ये २९४.२७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात १४१.५६ लाख मुलींचा समावेश आहे. सर्वाधिक विद्यार्थ्यांची नोंदणी उत्तर प्रदेशात झाली असून तेथे ५८.७१ लाख विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ३०.९५ लाख, तमिळनाडूत २४.८२ लाख, मध्य प्रदेशात १६.७६ लाख विद्यार्थी आहेत. या २९४.२७ लाख विद्यार्थ्यांपैकी ३५.१५ टक्के विद्यार्थ्यांनी कला शाखेत प्रवेश घेतला, १६.८८ टक्के विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत तर १६.२५ टक्के विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान तर १३.२३ टक्के विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. शिक्षणशास्त्र ४.०४ टक्के, वैद्यकशास्त्र ४.०२ टक्के, व्यवस्थापन ३.३२ टक्के, संगणक विज्ञान ३.२९ टक्के, विधि शाखा १.६२ टक्के, कृषी ०.८२ टक्के, पशू विज्ञान ०.१२ टक्के आणि १.२० टक्के विद्यार्थी इतर क्षेत्रांकडे वळले आहेत.
सर्वाधिक पीएच. डी. विज्ञान शाखेत
२०१५-१६मध्ये २७,६७१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. बहाल करण्यात आली. अन्य विद्याशाखांमध्ये सर्वाधिक पीएच.डी. ७६३६ एकटय़ा विज्ञान शाखेतल्या आहेत.
राज्यात १४.३५ लाख विद्यार्थिनी उच्च शिक्षणाकडे
महिलांचा उच्च शिक्षणातील टक्का पाहिल्यास १०० पुरुषांच्या मागे ९२ महिला सध्या उच्च शिक्षण घेत असल्याचे २०१६-१७ची आकडेवारी सांगते. महत्त्वाचे म्हणजे, लक्षद्वीपमधील सर्वाधिक म्हणजे ७१.५६ टक्के नोंदणी केली आहे. त्यापाठोपाठ गोव्यात ६०.३८ टक्के महिलांनी उच्च शिक्षणाची कास धरली आहे. आकडेवारीचा विचार केल्यास उत्तर प्रदेशात २८.१३ लाख महिलांनी तर महाराष्ट्रात १४.३५ लाख महिलांनी उच्च शिक्षणासाठी नोंदणी केली आहे. तमिळनाडूमध्ये हे प्रमाण १३.१७ लाख एवढे आहे. महिलांची जास्तीत जास्त नोंदणी कला शाखेत आहे. हे प्रमाण ४०.०६ टक्के आहे, तर विज्ञानात (१७.४८टक्के), वाणिज्यमध्ये (१३.५३टक्के) या तीन विद्याशाखेतील महिलांचे प्रमाणच ७१.०६ टक्के आहेत, हे विशेष.