पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून आलेले हजारो शेतकरी, मोर्चाचे भव्य स्वरूप, शासन-कारखानदार यांच्याविरुद्ध घेतलेली आक्रमक भूमिका आणि शासनाविरुद्ध यल्गार पुकारणारी ऐतिहासिक सभा. या साऱ्यांनीच कराडमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आजचे आंदोलन गाजले. या आंदोलनासाठी जमलेली गर्दी ही आजवर या शहरात कुठल्याही आंदोलनासाठी जमलेली विक्रमी गर्दी असल्याचे बोलले जात आहे.
उसाला तीन हजार रुपयांच्या पहिल्या उचलीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आजच्या नियोजित आंदोलनाला प्रशासन, पालिका व शेती उत्पन्न बाजार समितीनेही जागा देण्यास नकार देताना, व्यापाऱ्यांना हाताशी धरून कराडात आंदोलन नकोच अशी वातावरणनिर्मिती केली होती. परंतु कायदा-सुव्यस्थेचा विचार करत बाजार समितीचे पटांगण या आंदोलनासाठी अखेर देण्यात आले. या आंदोलनस्थळाकडे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत विराट मोर्चाने दाखल झाले. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ठिकठिकाणाहून आलेल्या हजारो शेतकऱ्यांचा समावेश होता. कराडमधील ही आजवरची उच्चांकी गर्दी असल्याचे बोलले जात आहेत.
दरम्यान, या आंदोलनापूर्वी प्रशासनकर्त्यांनी राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा केली. प्रक्षोभक व चेतावणीखोर वक्तव्ये टाळावीत अशी विनंती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. व जिल्हा पोलीसप्रमुख के. एम. एम. प्रसन्ना यांनी त्यांना या वेळी केली. जवळपास अर्धा तास चाललेल्या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे, प्रांताधिकारी संजय तेली, कराड विभागीय पोलीस अधिकारी मितेश घट्टे, तहसीलदार सुधाकर भोसले हेही अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर ऊसदराचे समर्थन करणाऱ्या तसेच, शासनकर्ते व साखर कारखानदारांच्या निषेधाच्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून सोडत कराडच्या मुख्य बाजारपेठेतून हजारो ऊस उत्पादकांनी शक्तिप्रदर्शन केले. आंदोलन सुरू असताना बाजारपेठ बंद होत्या. शहरात आंदोलनकर्त्यांना ठिकठिकाणी प्रतिसाद दर्शविण्यात येत होता. माता, भगिनींनी पिण्याच्या पाण्याची सोय करून एक प्रकारे आंदोलकांचे स्वागतच केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका घेऊन व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. यावर दुकानाच्या कट्टय़ावर उभे असलेल्या व्यापाऱ्यांना आंदोलनकर्त्यांनी दिलासा दिला. आम्ही बाजारपेठ बंद पाडायला आलो नाही. तर ऊसदरासाठी आम्ही लढा देत आहोत. दुकाने उघडी ठेवा, आमचा लढा शासन व साखर कारखानदारांशी असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात येत होते. परिणामी, कराडच्या बाजारपेठेत समाधानाचे वातावरण पसरले आणि आंदोलनानंतर ही दुकानेही उघडली.
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा