यंदाच्या मार्च महिन्यात पहिल्यांदाच १५ हजार ७३ मेगाव्ॉट विजेची उच्चांकी मागणी गेल्या २५ मार्चला नोंदविण्यात आली. महावितरणने १४ हजार २१७ मेगाव्ॉट विजेचा पुरवठा योग्य व्यवस्थापन करून केला असला तरी अद्यापही ८५६ मेगाव्ॉटचा तुटवडा कायम राहिला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात विजेची मोठय़ा प्रमाणात मागणी होण्याची शक्यता वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
महाराष्ट्रात महावितरणकडे रोज सरासरी १४ हजार मेगाव्ॉट विजेची मागणी केली जाते. उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानाने घरासह कार्यालयात कुलर, पंखे, एसीचा वापर वाढत असल्याने १४ हजार ५०० पर्यंत या मागणीचा उच्चांक वाढणार आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून या वाढीव विजेच्या मागणीचा कालावधी सुरू होतो. महाराष्ट्रात जवळपास १५ हजार ७३ मेगाव्ॉट विजेच्या उच्चांकाची मागणी २५ मार्चला नोंदविल्याची माहिती आहे. नोंदविलेल्या मागणीपैकी महावितरणने १४ हजार २१७ मेगाव्ॉट मागणीचा पुरवठा करण्यात यश मिळविले.
यामुळे महावितरणच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुना समोर आला. परंतु ८५६ मेगाव्ॉट एवढी विजेची कायम तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप उन्हाळ्याचे तापमान फारसे वाढले नसतानादेखील मागणी वाढल्याने अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
वीज प्रकल्पांना दुष्काळामुळे पाणी कमी मिळत असल्याने वीज उपलब्धता वाढण्याची शक्यता नसून मागणी वाढल्याने महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांची चिंता वाढल्याचे बोलले जात आहे. सध्या फिडरनिहाय भारनियमन महाराष्ट्रात सुरू असून वर्ग ‘इ’पासून खालच्या फिडरवर भारनियमन सुरू आहे.