सातारा : दिवाळीसाठी महाबळेश्वर, पाचगणीसह साताऱ्यातील, कास आणि वासोटा आदी गिरीस्थळे पर्यटनासाठी सज्ज झाली आहेत. पावसाचे सावट दिवाळी हंगामावर असले तरी वातावरण एकदम आल्हाददायक आहे. हॉटेल व्यावसायिक, वेण्णा लेकवरील घोडेसवारी करणारे छोटेमोठे व्यावसायिक उत्साहात आहेत. दाट धुके, बोचरी थंडी आणि निसर्गाचे विलोभनीय रूप पर्यटकांना साद घालत आहे. दिवाळीनिमित्त विविध ठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे.

पाचगणी, तापोळा, प्रतापगड, ऑर्थररसीट पॉईंट, केटस पॉईंट या ठिकाणी पर्यटकांची मोठ्य़ा प्रमाणात गर्दीची अपेक्षा आहे. पर्यटकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी पालिका व पोलीस प्रशासन सज्ज आहे. नेहमीप्रमाणे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा प्रयत्न करीत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले महाबळेश्वर सध्या दिवाळी सुटीमुळे पर्यटकांची मोठी रेलचेल पाहावयास मिळेल, अशी अपेक्षा आहे. दिवाळी सुटीमुळे मोठ्य़ा संख्येने विविध राज्यांतून पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल होणार आहेत. यामध्ये गुजरातमधून आलेल्या पर्यटकांची संख्या अधिक असणार आहे. पर्यटनास प्रसिद्ध क्षेत्र महाबळेश्वरसह सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉईंट या स्थळांवर पर्यटकांची गर्दी होणार आहे. किल्ले प्रतापगड पर्यटकांचे आकर्षण आहे.

हे ही वाचा…. Maharashtra Assembly Election 2024 Live : सदा सरवणकर माहीममधून लढण्यावर ठाम, यासह महत्त्वाच्या घडामोडी

यावर्षीच्या जास्तीच्या पावसाने अंतर्गत असणारे रस्ते अतिशय खराब झाल्यामुळे पर्यटनासाठी आलेले पर्यटक आणि टॅक्सी व्यवसाय करणाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सध्या नौका विहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेकला नौकाविहाराचा आनंद लुटताना पर्यटकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज आहे. नौकाविहारासोबतच घोडेसवारी, गेम्स, स्ट्रॉबेरीपासून बनविलेली विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस येथे पर्यटक पाहावयास मिळणार आहेत. दिवाळी हंगामामुळे शनिवार, रविवार व सलग आलेल्या सुटीमुळे महाबळेश्वर गजबजून जाणार आहे. वेण्णालेक येथे पर्यटकांना काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. स्वागतासाठी येथील मुख्य बाजारपेठा सजल्या असून, मोठ्य़ा प्रमाणावर पर्यटक खरेदीसाठी बाजारपेठेत येतात. बाजारपेठेतील प्रसिद्ध चप्पल, चणे, जाम येथे खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. पालिकेच्या वतीने नूतन वाहनतळ तसेच ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. वेण्णालेकसह काही ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागत आहे. मात्र, पोलीस प्रशासन अधिक कुमक मागवून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील थंड हवामान, विपुल पर्जन्य, पर्यटनाच्या दृष्टीने सुखसुविधा, उच्च दर्जाची हॉटेल्स यामुळे पर्यटक मोठ्य़ा संख्येने आकर्षित होत आहेत. एमटीडीसी हॉटेलमध्ये आत्ताच आरक्षण झाले आहे. पाचगणी येथेही पर्यटकांच्या स्वागतासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास आज शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पर्यटकांच्या स्वागतासाठी वनविभाग सज्ज आहे.

हे ही वाचा… Ajit Pawar Baramati : “बारामतीत लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं”, अजित पवारांचं विधान चर्चेत!

महाबळेश्वर पाचगणी प्रमाणे कास पठारावर बारमाही पर्यटनासाठी सातारा जिल्हा प्रशासन वन विभाग प्रयत्नशील आहे. साताऱ्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटनवाढीसाठी स्थानिक, वन्यप्रेमी आणि नागरिकांचा सहभाग वाढविला जाईल. – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा.

महाबळेश्वरला या वर्षीच्या दिवाळी सुट्टीत मोठी गर्दी अपेक्षित आहे. त्या दृष्टीने पालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे. पर्यटकांना सर्व सोयीसुविधा पुरविल्या जातील. यावेळच्या पावसाने निसर्ग एकदम चांगला आहे. पर्यटकांनी वाहतूक कोंडी होईल, अशा ठिकाणी वाहने उभी करू नयेत. इतर पर्यटकांना त्रास होईल, असे वर्तन करू नये. – योगेश पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक, महाबळेश्वर गिरीस्थान पालिका