जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात पुणे न्यायालयाने दोषी ठरविलेल्या हिमायत बेग याला औरंगाबाद लोकसभेचा उमेदवार म्हणून बहुजन मुक्ती पार्टीने रिंगणात उतरविण्याचे ठरविले आहे. तो ‘निरपराध’ असल्याचा दावा बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल मकरे, रमेश राक्षे यांनी बुधवारी येथे केला.
बेग यास पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तो सध्या मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र, त्याला दिलेल्या शिक्षेच्या अनुषंगाने वरिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल केले असल्याने त्याला निवडणूक लढविता येते, असा दावा मकरे यांनी पत्रकार बैठकीत केला. ५२ हजारांहून अधिक निर्दोष मुस्लिमांना वेगवेगळ्या खटल्यांत गुंतविले असून ते निर्दोष आहेत. त्यांचा प्रतिनिधी म्हणून बेग याने निवडणूक लढवावी, अशी विनंती केली असल्याचे मकरे म्हणाले. त्याच्या संपर्कात आहोत. वकिलामार्फत ते काम होत आहे. एनआयए या संस्थेने बेग यास क्लीन चिट दिली असल्याचा दावा मकरे यांनी केला. शिक्षा झालेल्या आरोपीला ९० दिवसांत वरिष्ठ न्यायालयात अर्ज केला असेल, तर निवडणूक लढविता येते, असे या वेळी सांगण्यात आले.
हिंगोलीत यू. पी. राठोड, नांदेडात राजरतन आंबेडकर, परभणीत बबनराव मुळे, बीडला भगवान साकसमुद्रे, उस्मानाबादेत सय्यद अहमद व जालना येथून रमेश राठोड यांना उमेदवारी दिल्याचे मकरे म्हणाले. सुनीता राठोड, बाळासाहेब मिसाळ व प्रतिभा ओहाळे आदींची उपस्थिती होती.

Story img Loader