बेताच्या परिस्थितीतील कंडक्टरचा पोरगा, सरावासाठी गेला अन् ‘हिंद केसरी’ झाला. अशी थोडक्यात तसेच, गमतीदार यशोगाथा ठरली आहे, कराड तालुक्यातील सुर्ली या छोटय़ाखानी खेडय़ातील मल्ल संतोष वेताळची. हरियाणातून उद्या बुधवारी रात्री संतोष सुर्ली या आपल्या गावी येणार आहे. त्यानंतर कराड तालुका कुस्ती संघटना, ग्रामस्थ सुर्ली, छत्रपती शिवाजी आखाडा कराड आणि मित्र परिवारातर्फे त्यांची भव्य विजयी मिरवणूक कराडातून काढण्यात येणार असल्याचे कराड तालुका कुस्ती संघटनेचे सचिव प्रा. पहिलवान अमोल साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अखिल भारतीय कुस्ती महासंघाने हरियाणा येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदकेसरी कुस्ती स्पध्रेत पहिलवान संतोष पांडुरंग वेताळ याने खुल्या गटात दिल्लीचा मल्ल देवेंद्रकुमार याला पोकळ घिस्सा डावावर चीतपट करून मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब, चांदीची गदा आणि एक लाख रुपयांचे इनाम पटकावून ऑलिम्पिकवीर खशाबा जाधवांच्या कराड तालुक्याचा नावलौकिक सर्वदूर नेला.
रोहतक (पानिपत, हरियाणा) येथे ५ एप्रिलपासून हिंदकेसरी व कुमार भारतकेसरी स्पध्रेला प्रारंभ झाला. खुल्या गटात, संतोष वेताळ यांच्यासह २० मल्ल सहभागी झाले होते. पहिलवान वेताळ याने मैदानात एकूण पाच लढती जिंकल्या. पहिली लढत दिल्लीच्या सुरेंद्र कुमार बरोबर गुणांवर मात केली. पाठोपाठ उत्तर प्रदेशचा रमेशकुमार, हरियाणातील कॅप्टन चंद्ररूप आखाडय़ाचा मल्ल संदीप, रोहतकचा सोनू या सर्वाना चीतपट करून अंतिम फेरीत गतसालचा भारत केसरी देवेंद्रकुमार यांच्यावर पोकळ घिस्सा डावावर संतोष वेताळने हिंद केसरीचा ‘जय हो’ मिळवला. आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.
त्याला हरियानाचे मुख्यमंत्री राजेंद्र हुड्डा व कुस्ती महासंघाचे सचिव राकेश कुमार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते हिंद केसरी किताब प्रदान करण्यात आला. संतोषला ‘हिंदकेसरी’ बहुमान मिळाल्याची वार्ता सुर्ली गावासह कराड तालुक्यात समजताच कुस्तीप्रेमींनी जल्लोष केला. संतोष वेताळच्या यशाने त्यांचे जवळचे सहकारी नवनाथ पाटील यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.
संतोष वेताळचा जन्म १९८१ साली झाला. त्याने गावच्या तालमीतून वस्ताद सतीश चव्हाण व अजय भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला सुरुवात केली. त्यानंतर कोल्हापूर येथील गंगावेश तालीम येथे विश्वास हारूगले व हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीत नावलौकिक कमावला. तीन वेळा राष्ट्रीय कुस्ती व महाराष्ट्र केसरी स्पध्रेत ८४ व ९६ किलो गटात महाराष्ट्रचे प्रतिनिधित्व करून प्रावीण्य मिळवले आहे. पलूस, कुंडल, बांबवडे, वारणा, कर्नाटक, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातील अनेक कुस्ती मैदाने त्याने गाजवून ‘सरपंच केसरी’ चा किताबही मिळवला आहे. महाराष्ट्र केसरी स्वर्गीय संजय पाटील यांच्या प्रेरणेतून त्याने कुस्तीचे धडे घेतले आहेत. त्याला धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती कराड तालुका कुस्ती संघटनेचे सचिव प्रा. पहिलवान अमोल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतोष वेताळ याने कराड तालुक्यातून हिंद केसरी होण्याचा बहुमान मिळवल्यामुळे कराडकरांची मान आणखी उंचावली आहे. हरियाणातून उद्या बुधवारी रात्री तो सुर्ली आपल्या गावी येणार आहे. त्याची भव्य मिरवणूक कराडातून काढण्यात येणार असल्याचे साठे यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, संतोष वेताळ याने कराडमध्ये अद्यावत तालीम उभारण्याचा संकल्प सोडला असून, त्यासाठी शासनाला साकडे घालणार असल्याची भूमिका घेतली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

Story img Loader