भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षांनिमित्त गाजलेल्या जुन्या हिंदी-मराठी चित्रपटांचा महोत्सव येत्या शुक्रवारपासून (१५ मार्च) आयोजित करण्यात आला आहे.  महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ व जिल्हाधिकारी यांच्यातर्फे संयुक्तपणे आयोजित या महोत्सवाबद्दल माहिती देताना जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले की, येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात १५ मार्च ते २१ मार्च या काळात हा अभिनव उपक्रम होत आहे. त्यानिमित्त रत्नागिरीकरांना प्रभात फिल्म कंपनीचे गाजलेले ‘संत तुकाराम’, ‘कुंकू’, ‘रामशास्त्री’, शाहीर दादा कोंडके यांचा ‘सोंगाडय़ा’, हंसा वाडकरच्या अभिनयाने रंगलेला ‘सांगत्ये ऐका’, राजा परांजपेंचा अजरामर ‘पेडगांवचे शहाणे’, राजा गोसावींच्या विनोदाने फुललेला ‘लाखाची गोष्ट’, सबकुछ पुलं म्हणून प्रसिद्धी पावलेला ‘गुळाचा गणपती’ यांसारख्या जुन्या मराठी चित्रपटांप्रमाणेच नर्गिसचा ‘मदर इंडिया’ आणि व्ही. शांताराम यांचा ‘दो ऑंखें बारा हात’, ट्रॅजेडी किंग बलराज सहानीचा ‘दो बिघा जमीन’ अशा एकाहून एक सरस चित्रपटांची मेजवानी मोफत मिळणार आहे.  सावरकर नाटय़गृहात सकाळी ११ ते रात्री १०.३० या वेळात दररोज चार चित्रपट या पद्धतीने एकूण २४ चित्रपटांचा हा महोत्सव साजरा होणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

Story img Loader