आंतरधर्मीय विवाहाला आईवडिलांनी विरोध केल्याने मुलासोबत घरातून निघून गेलेल्या नागपूरमधील तरुणीची शुक्रवारी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगद्वारे साक्ष घेण्यात आली. स्वेच्छेने विवाह केल्याचे तरुणीने म्हटले असून मुलीच्या साक्षीमुळे लव्ह जिहादचे राजकारण करणाऱ्या बजरंग दलाला चपराक बसली आहे.
नागपूरमधील मोहम्मद आरिफ आणि मोनिका उर्फ आयत या दाम्पत्याने प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. २९ ऑगस्टरोजी दोघांनी विवाहदेखील केला. विवाहाची नोंदणी करण्यासाठी दाम्पत्य निबंधक कार्यालयाकडे गेले असता त्यांना पोलिसांना याची माहिती देण्यास सांगितले. दाम्पत्याने इमामवाडा पोलीस ठाण्यात दस्तावेज सादर केले. मात्र याची माहिती बजरंग दलाला समजली आणि त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. आरिफच्या कुटुंबीयांनाही धमक्या येत होत्या. पोलिसांची बजरंग दलाला साथ असल्याचा आरोप दाम्पत्याने केला होता. शेवटी या दाम्पत्याने मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीडाकडे धाव घेतली. पोलिसांच्या त्रासामुळे आम्हाला ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी आणि संरक्षण द्यावे अशी विनंती त्यांनी हायकोर्टात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. न्यायमूर्ती वासंती नाईक आणि न्या. मुरलीधर गिरटकर यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली होती. हायकोर्टाने तरुणीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष घेण्याचे आदेश इमामवाडा पोलिसांना दिले होते.
शुक्रवारी इमामवाडा पोलिसांनी याप्रकरणात व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलिंगद्वारे साक्ष घेतली. स्वेच्छेने विवाह केल्याचे स्पष्टीकरण तरुणीने पोलिसांना दिले. तरुणीच्या साक्षीने हे प्रकरण निघाले असून यावरुन राजकारण करणाऱ्या बजरंग दलाला चपराक बसली आहे.