सरकारी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवरून संवाद साधताना ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, असं विधान सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात ‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राजकीय वातावरण तापत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या विधानावर आक्षेप घेतला आहे. ‘वंदे मातरम्’ऐवजी आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणणार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

‘वंदे मातरम्’ म्हणण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनीही या वादात उडी घेतली आहे. ‘जन-गण-मन’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करावं आणि सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ म्हणणं अनिवार्य करावं, अशी मागणी दवे यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

हेही वाचा- ‘वंदे मातरम्’वरुन नव्या वादाला सुरुवात; मुनगंटीवारांच्या आदेशास रझा अकादमीचा विरोध

‘वंदे मातरम्’ म्हणण्याला काही नेत्यांनी विरोध केल्याच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडताना आनंद दवे म्हणाले की, “काल पुन्हा एकदा काही मुस्लीम नेत्यांनी ‘वंदे मातरम्’ला विरोध केला. हिंदू महासंघ म्हणून आमची स्पष्ट भूमिका आहे की, त्यांनी ‘वंदे मातरम्’ म्हटल्यानं त्यांचं काहीही नुकसान होत नाही. त्यांच्या भावनासुद्धा दुखावल्या जात नाहीत. हिंदुंच्या दृष्टीने जिथे-जिथे अनुकूल घडतं, तिथे विरोध करण्याची गेल्या हजारो वर्षांची त्यांची परंपरा आहे. हे त्याचं एक नवीन उदाहरण आहे. अनेक लोकांनी ‘वंदे मातरम्’ म्हटलं आहे. अनेकांनी ‘वंदे मातरम्’ म्हणत लढा दिला आहे.”

हेही वाचा- “केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा असं मी म्हटलं नाही” सुधीर मुनगंटीवारांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

पुढे त्यांनी म्हटलं की, “कलम ३७० असेल किंवा रामजन्मभूमीचा निकाल असेल किंवा आणखी काही असेल, जे-जे हिंदुंना हवं आहे, त्याला विरोध करण्याच्या एकमेव कारणातून मुस्लीम समाज आणि मुस्लीम समाजातील काही नेते ‘वंदे मातरम्’ला विरोध करत आहेत. त्यामुळे आमची अशी भूमिका आहे की, अखंड भारत जेव्हा करायचा आहे, तेव्हा करा… पण त्याआधी ‘जन-गण-मन’ऐवजी ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रगीत घोषित करा. ‘वंदे मातरम्’ हे सर्व शाळांमध्ये आणि सरकारी कार्यालयात म्हणणं अनिवार्य करावं, याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. हा हिंदुस्तान आहे आणि हिंदुंचाच आहे. हे नेहमी-नेहमी का दाखवून द्यावं लागतं? हा आमचा प्रश्न आहे, असंही दवे म्हणाले.