महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखेरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे नामकरणाचा वाद पुन्हा एकदा उफाळून निघाला आहे. औरंगाबादचं नामकरण करण्यावरून एमआयएम पक्ष आक्रमक झाला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात आंदोलन करण्यात आलं आहे.
दरम्यान त्यांनी औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करावं की नाही? याबाबत मतदान घ्यायला हवं, अशी मागणी केली आहे. यावरून हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी इम्तियाज जलील यांच्यावर बोचरी टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत इम्तियाज जलील यांना अनेक प्रश्न विचारले आहेत. “औरंगाबादचं नामकरण करण्यासाठी मतदान घ्यावं,” हे इम्तियाज जलील यांचं विधान मूर्खपणाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित व्हिडीओत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे म्हणाले, “औरंगाबाद शहराचं नामकरण संभाजीनगर करायचं की नाही? याबाबत मतदान घ्यायला हवं, अशी वेगळीच कल्पना इम्तियाज जलील यांनी सुचवली आहे. मला वाटतं त्यांचं विधान मूर्खपणाचं आहे. देशाची फाळणी करताना मतदान घ्यायचं की नाही? हे इम्तियाज यांच्या पूर्वजांनी का सुचवलं नाही. अयोध्या, काशीविश्वेश्वर आणि मथुरेच्या बाबतीत मतदान घ्यायला पाहिजे होतं का? किंवा आता मतदान घ्यावं का? हे इम्तियाज यांनी आम्हाला सांगावं. हिजाब घालण्याबाबत देखील मतदान घ्यायला पाहिजे का? पुण्येश्वर महादेवाच्या मंदिराच्या बाबतीत देखील मतदान घ्यायचं का? हा सुद्धा आमचा प्रश्न आहे,” अशी टीका दवे यांनी केली आहे.
हेही वाचा- “औरंगाबादच्या नामांतरासाठी निवडणूक घ्या”, इम्तियाज जलील यांची मागणी
“समान नागरी कायद्याचं काय करायचं? ३७० बाबत काय करायला हवं होतं? काश्मीरमध्ये हत्याकांड घडल्यानंतर मुस्लिमांचा मतदानाचा अधिकारच काढून घ्या, अशी भूमिका देशातील अनेक लोकांनी मांडली होती. मग त्यावर देखील मतदान घ्यायचं का? असा सवालही दवे यांनी इम्तियाज जलील यांना विचारला आहे. “या देशात प्रत्येक गोष्टीवर जिथे-जिथे मुस्लीम समाज हिंदूंच्या आणि हिंदुस्थानच्या आडवा येतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मतदान घ्यायला हवं का, हे इम्तियाज जलील यांनी जाहीरपणे सांगावं,” अशी मागणीही दवे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.