कुंभमेळ्याची पर्वणी साधण्यासाठी अनेक पंथांचे साधू-महंत नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. परंतु यात भोंदू किती, हा प्रश्न असून अशा भोंदूंना अटकाव करण्यात येणार आहे. कुंभपर्वात संत संमेलनाचे आयोजन करून भोंदू साधू या विषयावर राष्ट्रीय हिंदू आंदोलनातर्फे चर्चाही करण्यात येणार आहे.
बहुचर्चित राधे माँ, त्रिकाल भवन्ता यांच्यासारखे वादग्रस्त कोणी साधू कुंभमेळ्यात सहभागी होऊ नयेत, यासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाने तयारी सुरू केली आहे. संबंधितांना मज्जाव करतानाच राष्ट्रीय हिंदू आंदोलनातर्फे चर्चाही करण्यात येणार आहे.
भगव्या वस्त्राआड चुकीचे वर्तन करणाऱ्या तथाकथित साधूंमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे. यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचे संयोजक सुनील घनवट तसेच पंचमुखी हनुमान मंदिराचे श्री महंत भक्तिचरण महाराज यांनी दिली. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काही मूठभर लोकांमुळे हिंदू धर्म, खरे साधू-महात्मा आदी अपकीर्त होत आहेत. त्याचा भाविकांच्या श्रद्धेवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या विषयी जनप्रबोधन केले जाईल, असे घनवट यांनी सांगितले. भक्तिचरण दास यांनी भगवे वस्त्र घातलेल्या कुठल्याही व्यक्तीला प्रसारमाध्यमांकडून साधू-महाराज वा बाबा म्हटले जाते असे नमूद केले. परिणामी, समाजात चुकीचा संदेश जातो. साधू कोणाला म्हणावे हे प्रसारमाध्यमांनी आधी समजून घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. भगवे वस्त्र परिधान करून चुकीचे वर्तन करणाऱ्या तथाकथित साधूंविषयी चर्चा करण्यासाठी कुंभमेळ्यात संत संमेलनाचे आयोजन करण्यात येईल. पुरोहित संघाच्या ध्वजारोहणावेळी साध्वी त्रिकाल भवन्ता यांनी महंतांशी वाद घातला होता. कुंभमेळा सुरू झाल्यापासून प्रशासन व साधू-महंतांवर त्यांचे टीकास्त्र सुरू आहे.
मोठी रक्कम स्वीकारून महंताई बहाल करण्याचे त्यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ उघड झाले होते. त्यांच्यासह मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राधे माँ यासारख्या वादग्रस्तांना कुंभमेळ्यात सहभागी होण्यापासून रोखले जाईल, असे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा