लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : श्रीराम नवमीचे औचित्य साधून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर आदी अनेक मंदिरांमध्ये प्रचाराचा नारळ फोडून भाजपच्या हिदुंत्ववादी प्रचाराला आव्हान दिले असताना भाजपचे उमेदवार राम सातपुते हे राम नवमी सोहळ्यात रममाण होत हिंदुत्वावर स्वार होण्यात कसर सोडली नसल्याचे पाहायला मिळाले.
अयोध्येत श्रीरामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच राम नवमी साजरी झाली. त्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण होते. अनेक राम मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम होत असताना काही मंडळांनी राम नवमी उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करताना भगवेमय माहोल तयार केला होता. मगळवार पेठ, दाजी पेठ, भवानी पेठ, साखर पेठ भागात भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी भेटी देऊन राम नवमी उत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारी व संघ परिवाराशी संबंधित मंडळींची उपस्थिती होती.
आणखी वाचा-साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात; उमेदवारी अर्जाबाबत म्हणाले, “मी एकटा…”
आयोध्येत प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उभारणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमुळेच शक्य झाली. मोदी यांनी हिंदूहित जोपासले आहे. आता पुन्हा त्यांना साथ देण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन सातपुते यांनी रामनवमी उत्सवात केले.
राम नवमी उत्सवाच्या पूर्वसंध्येला दाजी पेठेत डॉ. हेडगेवार पटांगणावर भेट देऊन अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघ आणि श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सहभाग नोंदविला. यावेळी जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी आणि अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ समाधीमठाचे मुख्य पुजारी चोळप्पा महाराजांचे वंशज धनंजय महाराजांच्या उपस्थितीत १५१ हवन कुंडीय विधी पार पडला. यावेळी सातपुते यांनी दोन्ही महाराजांचे दर्शन घेऊन श्रीरामाचा नारा दिला. सायंकाळी शहरात निघालेल्या राम नवमी शोभायात्रेतही त्यांचा सहभाग होता.