वाई:संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांचा मोर्चा काढला. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वत्र टीका होत असताना साताऱ्यात त्यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक करण्यात आला.
हेही वाचा >>> VIDEO: “संभाजी भिडेंवर तातडीने कारवाई करावी”, राज्य महिला आयोगाची फडणवीसांकडे मागणी
संभाजी भिडे यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसने तर त्यांना अटक करावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरु केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटना आणि धारकऱ्यांनी मोर्चा काढला.
यावेळी पोवई नाक्यावर संभाजी भिडे यांच्या प्रतिमेला दुग्धभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी माध्यमांनी भिडे यांचा एकेरी उल्लेख टाळावा अशी आगपाखड देखील भिडे समर्थकांनी केली.मोर्चात मोठ्यासंख्येने धारकरी व महाविद्यालयीन युवक सहभागी झाले होते.
भिडेंबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार विद्या ठाकूर यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
हेही वाचा >>> “संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाही”; बावनकुळे म्हणाले, “महायुतीत आमच्या मंचावर ते येतील, त्यांच्या मंचावर..’
याबाबत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. भिडे गुरूजी यांनी विदर्भात सभांचा धडाका लावला आहे. महाराष्ट्राचा तसेच श्री शिवछत्रपती व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान असा इतिहास सांगत आहेत. त्यांच्या सर्वांना मोठा प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे त्यांच्या काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूजींवर अत्यंत हिन पद्धतीने खालच्या दर्जाची चिखल फेक सुरू केली आहे. या सर्व गैरकृत्याचा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान निषेध करत आहे असे निवेदनात म्हटले आहे.