Aurangzeb Whatsapp Status Kolhapur: कोल्हापुरात शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी काही आक्षेपार्ह स्टेटस विशिष्ट धर्माच्या लोकांनी फोनवर ठेवली होती. तसंच दोन दिवसांपूर्वी अहमदनगर या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी निघालेल्या संदलमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले गेले. त्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले. पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. त्याआधी पोलिसांसह धक्काबुक्कीचे काही प्रकार झाले. त्यामुळे आंदोलकांवर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला आहे.
कोल्हापुरात सौम्य लाठीमार
कोल्हापुरात मटण मार्केट या भागात सौम्य लाठीमार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे रॅली काढण्यावर ठाम होते. मात्र कोल्हापूर पोलिसांनी विरोध करत आंदोलन किती वेळ करायचं आहे तेवढा वेळ करा मात्र रॅलीची संमती मिळणार नाही असं पोलिसांनी म्हटलं होतं. पोलीस आणि आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये अनेक दुकानं बंद आहेत तसंच काहीसं तणावाचं वातारवण अद्यापही आहे.
हा वाद का सुरु झाला?
शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी म्हणजेच ६ जून रोजी काही विशिष्ट धर्माच्या लोकांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं होतं. त्यानंतर ते स्टेटस व्हायरल झालं आणि तणाव निर्माण झाला.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे की कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आहे. कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसर वगळला तर शहरात इतर ठिकाणी शांतता आहे. तसंच काही तालुक्यांमध्ये दुकानं सुरु असल्याचीही माहिती समोर येते आहेत. विद्यार्थ्यांसह कुणालाही त्रास होऊ नये यासाठी आंदोलन मागे घ्या अशी विनंती पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना केली.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं आहे?
“अचानक औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले, कोण फूस लावतंय याची चौकशी सुरू झाली आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणतात मला माहितेय येथे दंगल घडणार आहे. त्यानंतर एक-दोन दिवसातच औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचं उदात्तीकरण करतात. त्यानंतर एक प्रतिक्रिया येते. या विधानाचा आणि घटनांचा संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आहेत? कोण यांना फूस लावतंय? कोण यांना उदात्तीकरण करण्याकरता सांगतंय? याची देखील चौकशी करतो आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.