हिंगोली: हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसमधून एकेक नेता बाहेर पडू लागला आहे. भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यानंतर आता जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अंतर्गत धुसफुशीतून हे सारे घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्ह्याबाहेर होणाऱ्या विविध बैठकांना देसाई येत नसल्याची चर्चा सुरू होती. हिंगोली जिल्ह्यात सातव विरुद्ध गोरेगावकर अशी गटबाजी अनेक वर्षांपासून सुरू आहे. अलीकडे त्यात भर पडल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदवर घेतल्यानंतर जिल्ह्यातील एक गट नाराज होता. जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या बैठकांमध्ये तसेच पक्षांकडून आयोजित कार्यक्रमासही हजर राहत नसत. राजीव सातव यांच्या कार्यकाळातच पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष माजी खासदार शिवाजी माने यांनी राजीनामा दिला. आमदार प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर राजीव सातव यांचे खंदेसमर्थक, पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांनी गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला. ते आता शिवसेना ( एकनाथ शिंदे) पक्षात दाखल झाले आहेत. विधानसभेवेळी उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार भाऊ गोरेगावकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली.

या दोन गटांमध्ये जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई यांची मात्र अडचण होत होती. दोन्ही गटांना सांभाळताना देसाई यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आता त्यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे.