तुकाराम झाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंगोली : जिल्हा काँग्रेससमध्ये अनेक वर्षांपासून असलेली सातव आणि गोरेगावकर या दोन गटातील गटबाजी आता विकोपाला गेली असून रविवारी झालेल्या मनोमिलन बैठकीत कार्यकर्ते मुद्यावरून गुद्यावर आल्याचा प्रकार घडला. दरम्यान झाल्या प्रकाराचा सविस्तर अहवाल आपण पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचे पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा हिंगोलीचे पक्ष निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यात दिवंगत खासदार राजीव सातव आणि माजी आमदार भाऊ पाटील- गोरेगावकर यांच्यात अनेक वर्षांपासून दोन गट आहेत. राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी डॉ.प्रज्ञा सातव यांच्या नावाखाली आता काँग्रेसचा हा गट कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीपासून माजी आमदार पाटील- गोरेगावकर दूर राहिले. निवडणुकीच्या निकालानंतर औंढा नागनाथ, सेनगाव या दोन नगर पंचायतीमध्ये ३४ पैकी ६ जागा काँग्रेसला मिळाल्याने पक्षाची मोठी हानी झाल्याचे पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आले. या दोन गटांचे मनोमिलन करण्यासाठी बाळासाहेब देशमुख, सहपक्षनिरीक्षक लक्ष्मण रायपतवार यांना रविवारी जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. देशमुख, रायपतवार यांनी सुरुवातीला माजी आमदार भाऊ पाटील-गोरेगावकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी त्यांच्या गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी सातव गटाकडून होणाऱ्या अन्यायासंदर्भात कैफियत मांडली.

देशमुख यांच्यासमवेत बैठक सुरू असताना वक्त्यांचा आवाज बाहेर ऐकू येत नसल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. यावरून पाटील-गोरेगावकर गटाच्या कार्यकर्त्यांना येथे का घेऊन आलात? असा सवाल सातव गटाकडून करण्यात आला आणि पक्षनिरीक्षकांना धारेवर धरण्यात आले. त्यानंतर सातव आणि पाटील-गोरेगावकर या दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. काही कार्यकर्ते पक्षनिरीक्षक देशमुख यांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान,जिल्हाध्यक्ष बोंढारे आणि इतरांनी कार्यकर्त्यांना आवरले. पक्ष निरीक्षकांची बाजू ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत सातव गटाचे कार्यकर्ते नव्हते. मुद्यावरून कार्यकर्ते गुद्यावर येत असल्याचा प्रकार पाहून देशमुख यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. दरम्यान गेल्या सात वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीकडून मला बैठकीचे कोणतेच निमंत्रण येत नाही. पक्षनिरीक्षकांनी बैठकीसाठी येण्याचा आग्रह धरला तेव्हा कार्यकर्ते येत असतील तर त्यांना घेऊन जा, मी थोडय़ा वेळानंतर विचार करेन, असे पक्षनिरीक्षकांना सांगितले होते. बैठकीत काय घडले हे पक्ष निरीक्षकांनाच अधिक माहीत असेल,असे देशमुख यांनी सांगितले.