हिंगोली : शिवसेनेतील बंडाळीच्या काळात निष्ठावंत म्हणून मिरवून घेतल्यानंतर आणि मतदारसंघात अश्रू ढाळून निष्ठेचे धडे देणारे भाषण करणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी शिंदे गटात सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगर यांना बोलावले नव्हते पण त्यांनी रात्री दीड वाजता दूरध्वनी करुन सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली  आणि ते आले असे सांगितले. त्यांच्या शिंदे गटात सहभागी होण्याने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने एका मताची भर पडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेतील बंडाळीनंतर संतोष बांगरही शिंदे गटात सहभागी होत असल्याचे वृत्त दोनदा बाहेर आले. पण दोन्ही वेळेस आपण ‘मातोश्री’वरच आहोत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच आपले नेते आहेत असे ते वारंवार सांगत राहिले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्येही त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास मतदान केले. मात्र, रात्रीतून चक्रे  फिरली आणि बांगर नव्या सरकारच्या गोटात सहभागी झाले.

मात्र, तत्पूर्वी आपण कसे निष्ठावान शिवसैनिक हे सांगताना त्यांनी डोळय़ात पाणी आणले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी त्यांचा सत्कार केला. ‘सेनेत ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या अंगावर पुन्हा गुलाल उधळला गेला नाही. तुम्हा सर्वाना हात जोडून विनंती करतो ‘पुन्हा तुम्ही उद्धव साहेबांकडे या, साहेब तुम्हाला मोठय़ा मनाने माफ करतील’, असे त्यांनी भावुकपणे सांगितले होते.

शिंदे गटात  सहभागी झालेले मराठवाडय़ातील नववे आमदार ठरले आहेत.  आमदार बांगर यांच्यासोबत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राम कदम हेही शिंदे गटात गेले आहेत.

यासंदर्भात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आता जे गेले ते गेले. उर्वरित कट्टर शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागू.’