हिंगोली येथील नगर पालिकेत विविध कराचा भरणा करण्याकडे नागरिकांचा कानाडोळा होत असल्याने पालिका आर्थिक संकटात सापडण्याच्या स्थितीत आहे. आतापर्यंत केवळ 37.41 टक्के वसुली झाली असून, वसुलीसाठी पथकाची निर्मिर्ती केली असुन, यापुढे बँड वाजवून करबुडव्यांकडून वसुली करण्याचे नियोजन नगरपालिका प्रशासनाने केले आहे.
मार्चच्या तोंडावर नगरपालिकेने मागील थकबाकी वसुली करण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. यामध्ये मालमत्ता थकबाकी 429.91 पैकी 159.10 तर पाणी पट्टी 293.99 पैकी 111.94 तसेच रोहयो 14 लाखापैकी 3.93, शिक्षण कर 104.83 पैकी 37.30 अशी एकुण 3 कोटी 15 लाख 27 हजार रूपयाची थकबाकी वसुल झाली आहे.
नगर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना वारंवार कराची रक्कम भरण्याचे आव्हान करूनही त्याला समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता नगर पालिका प्रशासनाने नविन शक्कल लढविली असून, ज्या लाभार्थ्यांकडुन कराचा भरणा होत नाही त्यांची नळ जोडणी तोडण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवसापासुन शहरातील विविध भागात कॅम्प घेण्यात आले. रिसाला बाजार, गांधी चौक, अष्टविनायक कॉलनी येथे तंबु टाकुन पथकातील कर्मचारी कराचा भरणा करावा याकरिता नागरिकांशी संवाद साधुन कर भरणा करून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
यावर्षी पालिका प्रशासनाला एकूण 8 कोटी 98 लाख 98 हजार रूपयाचे उद्दीष्ट देण्यात आले. ते पूर्ण करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या थकबाकीदारांनी 50 टक्के कर भरला आहे अशा ग्राहकांची नळ जोडणी सुरळीत केली जाणार आहे. 5 हजार रूपयाच्या वर थकबाकी असणार्यांची नावे काढली असता आतापर्यंत 2 हजार करबुडव्यांची नावे पुढे आली आहेत. त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. अशा करबुडव्यांची नावे चौकाचौकात प्रसिध्द करण्यात येणार असून, त्यांच्याच घरासमोर बँड वाजविण्याची तयारी नगरपालिका प्रशासनाने सुरू केली आहे.