मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याची दाणादाण उडवली आहे. संततधार पावसाने मालमत्तेचं मोठं नुकसान झालं असून, जीवितहानीही प्रचंड झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
तळीये गावात दरड कोसळल्यानं हाहाकार उडाला आहे. तळीयेमध्ये मदत व बचावकार्य सुरू असतानाच महाड तालुक्यात आणखी एक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत मोठी दरड कोसळली आहे. महाडपासून २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी असून, रायगड किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आजूबाजूला डोंगर भाग असून, दरड कोसळल्याची घटना घडली.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तळीयेतील दरड दुरर्घटनेनंतर ही घटना घडल्यानं हिरकणीवाडीत भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांना जवळच्या पाचाड गावात हलवलं जात आहे.
रायगड जिल्ह्यात दरड कोसळल्याची आणखी एक घटना घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.#MaharashtraRains #MaharashtraFloods #Raigad pic.twitter.com/WkFogzAXBb
— LoksattaLive (@LoksattaLive) July 24, 2021
राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिवृष्टीनं तडाखा दिला. पाऊस इतका भयंकर होता की, असंख्य गावं पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी नद्यांचं पाणी गावांमध्ये शिरल्यानं तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचं चित्र आहे. दरम्यान, एनडीआरएफसह लष्कर, नौदल, हवाई दलाला मदत व बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज तळीये गावाला भेट देऊन आढावा घेतला.