रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी ३१ मे पर्यंत हटवा अशी मागणी करणारं पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यानंतर आता वाघ्या या श्वानाबाबत इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी माहिती दिली आहे. रायगडावरील वाघ्या या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी याआधी शिवप्रेमींनीही केली आहे. मात्र ही समाधी हटवण्यात आलेली नाही. दरम्यान रविवारी संभाजीराजे छत्रपती यांनी पत्र लिहून ही समाधी कपोलकल्पित असून ती हटवावी अशी मागणी केली आहे.

संभाजीराजे छत्रपतींची मागणी काय?

हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे.

कपोलकल्पित समाधी उभारण्यात आली हे महाराष्ट्राचं दुर्दैव

समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे. कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली.

इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी काय म्हटलं आहे?

“रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोल कल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचं स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली” असं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे.

शिवाजी महाराजांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही-सावंत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये वाघ्या कुत्र्याच्या पात्राचा कुठेही उल्लेख नाही, असं इंद्रजीत सावंत यांनी एबीपी माझाच्या मुलाखतीत सांगितलं. आता या प्रकरणी सरकारकडून नेमकी काय कारवाई केली जाते? ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्थिव चितेवर ठेवण्यात आलं होतं. त्यावर त्यांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली होती अशी कथा रचण्यात आली. ही संपूर्ण खोटी कथा आहे. राजसंन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरींनी लिहिलं आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची किनार त्या नाटकाला आहे. तसंच अर्पण पत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. तिथूनच वाघ्या कुत्र्याची कथा जन्माला आली. पण राजसंन्यास हे नाटक छत्रपती शिवाजी राजांची, शंभू राजांची बदनामी करणारं नाटक आहे. त्या नाटकाची अर्पण पत्रिका रायगडासारख्या ठिकाणी आहे. कुत्र्याची प्रतिमा उंच बसवण्यात आली आहे. तसंच त्या अर्पण पत्रिका तिथे कोरण्यात आली आहे असंही इंद्रजीत सावंत यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.