राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. ही पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी शेगावमध्ये पोहचल्यावर तिथे सभा होणार आहे. या सभेस काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे.

नाना पटोले म्हणाले, “ महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सगळ्या सभांचा रेकॉर्ड ब्रेक अशी ही सभा आपल्याला शेगावमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचं कारणही असं आहे की, राहुल गांधी देशाच्या संविधानाला वाचवण्यासाठी, सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर जात आहेत.केंद्र सरकारने वाढवलेली महागाई, कृत्रिम महागाई बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न, छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न घेऊन राहुल गांधी निघालेले आहेत. त्यांच्या न्याय हक्कासाठी ते लढत आहेत. म्हणून आता राहुल गांधींची ही पदयात्रा ही केवळ राहुल गांधींची न रहता, जनतेची पदयात्रा झालेली आहे.” एबीपी माझाशी ते बोलत होते.

हेही वाचा – “हिंदुत्वाचं बाळकडू मिळालेलं असताना, भाजपाच्या नेत्यांकडून ‘हे’ जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील तर …” ; अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला!

याशिवाय “ या पदयात्रेत महिला, लहान मुले, गरीब, श्रीमंत हे सर्वजण यात्रेत स्वयंस्फुर्तीने सहभागी होत आहेत. दक्षिणेतून निघालेलं वादळ आता मध्य भारतात आलेलं आहे. याचं विराट रूप आपल्याला शेगावमध्ये पाहायला मिळणार आहे. ही पदयात्रा आता राहुल गांधींची राहिली नाही ती देशाच्या जनतेची झालेली आहे.” असंही पटोले म्हणाले.

याचबरोबर “ सोनिया गांधी शेगावमध्ये येणारच आहेत. त्या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे जे अन्य कोणी आले त्यांचे स्वागतच आहे. ही पदयात्रा आता राजकीय न राहता जनतेची झालेली आहे.” असं सांगत नाना पटोले यांनी सोनिया गांधी शेगावच्या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.

Story img Loader