सावंतवाडी : देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याचे ‘जागतिक वारसा स्थळ’यादित नाव समाविष्ट झाले आहे. यामुळे हा किल्ला जगाच्या नकाशावर ऐतिहासिक पर्यटनात झळकणार आहे. या जागतिक वारसा स्थळाला युनेस्को ची टीम दि.२४ ऑक्टोबर ला भेट देणार असल्याचे पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक राजेश दिवाकर यांनी विजयदुर्ग येथे ध्वजारोहण कार्यक्रम वेळी माहीती दिली. १५ ऑगस्ट दिवशी विजयदुर्ग ग्रामपंचायत व पुरातत्त्व विभाग यांच्याकडून ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले.
मराठ्यांच्या स्वराज्याचे आरमार म्हणजे दुर्ग, मग ते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर तैनात डोंगरी किल्ले असोत किंवा अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्ग. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची जागतिक वारसास्थळ म्हणून नोंद होणार आहे. सिंधुदुर्गवासियांसाठी ही आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. युनेस्कोची एक टीम लवकरच विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन पाहणी करणार आहे आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होणार आहे. ही घोषणा झाल्यानंतर सिंधुदुर्गच्या पर्यटनाला एक वेगळी कलाटणी मिळणार आहे.
भारतात ४२ जागतिक वारसा स्थळे
भारतात सध्या ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी ३४ सांस्कृतिक, सात नैसर्गिक आहेत आणि एक मिश्र प्रकारचे आहे. भारतातील मराठा लष्करी भूदृश्ये ही २०२१ मधील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील या स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेशासाठी नामांकित केलेली सहावी सांस्कृतिक संपदा आहे.
भारताने २०२४-२५ च्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी “मराठा मिलिटरी लँडस्केप्स”, मराठ्यांच्या राजवटीच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करणाऱ्या किल्ल्यांचे नामांकन केले होते. त्यात विजयदुर्ग किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आला.
विजयदुर्ग हा अभेद्य जलदुर्ग वाघोटन खाडीच्या दक्षिणेस एका विस्तीर्ण खडकावर उभा आहे. शिलाहार राजघराण्याच्या कारकिर्दीत म्हणजे सन १२०६ या काळात राजा भोज याने हा किल्ला बांधला. कोल्हापूरच्या पन्हाळा येथे शिलाहार घराण्यातील भोज राजा राज्य करीत होता. भोज राजाने एकंदर १६ किल्ले बांधले व काहींची डागडुजी केली त्यात विजयदुर्ग किल्ल्याचा समावेश आहे.
इ.स. १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकेपर्यंत या किल्ल्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली. शिलाहारांचे राज्य देवगिरीच्या यादवांनी इ.स. १२१८ मध्ये बुडविले. इ.स. १३५४ मध्ये विजयनगरच्या राजाने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला व कोकण प्रांत बळकावला. पुढे इ.स.१४३१ मध्ये बहमनी सुलतान अलउद्दीन अहमदशहा याने विजयनगर राजाचा पराभव केला. १४९० ते १६२६ या काळात बहामनी राज्याचे ५ तुकडे झाले. त्यात विजापूरचा आदीलशहाकडे कोकणप्रांत सोपविला गेला. त्यानंतर १६५३ पर्यंत सुमारे १२९ वर्षे विजयदुर्ग विजापूरकरांच्या अंमलाखाली राहिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५३ साली हा किल्ला विजापूरच्या आदिलशहाकडून जिंकून घेतला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला तेव्हा साधारण ५ एकर क्षेत्रात हा किल्ला विखुरलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी आरमारी केंद्र स्थापन करावयाचे असल्याने त्यांनी किल्ल्याची दुरुस्ती व व्याप्ती केली. १४ एकर ५ गुंठे इतक्या क्षेत्रापर्यंत या किल्ल्याची व्याप्ती वाढविली. पूर्वेच्या बाजूला नवीन तटबंदी उभारली. किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मारुती मंदिर आहे. पडकोट खुष्क म्हणजे किल्ल्याची मुख्य तटबंदी सोडून कांही अंतरावर बांधलेली तटबंदी. मुख्य दरवाजाला संरक्षण देणार्या निबीच्या दरवाजापुढे गेल्यावर ३० मिटर उंचीची तटबंदी. मुख्य दरवाजाच्या आत एक लहान दरवाजा होता, त्यास दिंडी दरवाजा म्हणत. रात्रौ मुख्य दरवाजा न उघडता त्याचा जाण्या-येण्यासाठी उपयोग करीत. डाव्या बाजूला खलबतखाना नावाची इमारत आहे. या इमारतीमध्ये सभा बैठका होत. या इमारतीचच्या समोर दारु-गोळ्याचे कोठार आहे.
आणखी वाचा-कर्जत जामखेडमध्ये मी पुन्हा येईन – जय अजित पवार
आरमाराचा दरारा निर्माण करणारा विजयदुर्ग
छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्ग. आणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला भक्कम केला. विजयदुर्गाच्या वायव्य दिशेला समुद्रात पाण्याखाली बांधलेली भिंत आहे. या शिवकालीन भिंतीला धडकून शत्रूची कैक जहाजे रसातळाला गेली. कमांडर विजय गुपचुप आणि डॉ शील त्रिपाठी यांनी या अनोख्या भिंतीबद्दल संशोधन केले आहे. या ठिकाणी दगडी नांगर, हत्यार म्हणून वापरल्या जाणाऱ्या लोखंडी बेचक्या आणि काही मातीची भांडी असे अवशेष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीच्या संशोधनात सापडले आहेत. पश्चिमेकडे दूर समुद्रात आंग्रे बँक नावाची प्रवाळांची उंची आहे, जिथं समुद्राची खोली अचानक कमी होते. यावरही एनआयओच्या संशोधकांनी डायविंग करून बरीच माहिती घेतली आहे. या अभेद्य किल्ल्याला इंग्लिश आरमाराने पूर्वेकडील जिब्राल्टर असा किताब दिला होता. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात मराठा आरमाराचा दरारा पश्चिम किनाऱ्यावर निर्माण झाला. त्याचा हा विजयदुर्ग किल्ला साक्षीदार आहे.