स्वातंत्र्यापूर्वीच्या इतिहासाबरोबर स्वातंत्र्योत्तर इतिहास समाजाला सांगणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतरही अनेकांनी देशरक्षणासाठी शौर्य गाजविले आहे. त्याची माहिती ठेवण्याची गरज वाटत नाही. ही खंत असल्याचे प्रतिपादन कॅप्टन उदयसिंह निकम यांनी केले.
प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या ३३९ व्या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात कॅप्टन निकम बोलत होते. यावेळी प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक विजयाताई भोसले, नगराध्यक्षा नीलिमा खरात, कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, उपाध्यक्ष विनायक सणस सरचिटणीस राजेंद्र मोहिते, अध्यक्ष संजय भोसले आदी उपस्थित होते. मोठय़ा पोलीस बंदोबस्तात हा कार्यक्रम झाला. यावेळी सुप्रसिद्ध समाजसेविका अपर्णा वाघ यांना वीर जीवा महाले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर गोपीनाथ पंत बोकील अधिवक्ता पुरस्कार वाईतील ज्येष्ठ वकील ललित चव्हाण यांना कॅप्टन निकम, श्रीमती भोसले, एकबोटे आदींच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी बोलताना कॅप्टन निकम म्हणाले, समाजासमोर शिवाजीमहाराज आदर्श आहेत. अफजलखानाशी झालेली लढाई हा जगातील मोठय़ा लढायांच्या विषयातली अभ्यासाची लढाई आहे. अन्याय, अत्याचार सहन करायचा नाही. रामराज्यासारखे राज्य आता येणार नाही. परंतु तसे शासन देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. शिवाजीमहाराजाचे स्वराज्यासाठी खडतर परिश्रम हे अवर्णनीय धर्मरक्षाचे काम आहे. स्वातंत्र्यानंतर देशाने अनेक लढाया लढल्या. इतिहासातील लढायांएवढेच या लढायांनाही महत्त्व आहे. अनेकांना कोणती लढाई का व कशासाठी झाली हे माहिती नाही. देशासाठी परमवीर, महावीर चक्र आदी शौर्य पुरस्कार विजेत्यांनी कोणती कामगिरी केली याची माहिती सर्वाना होणे गरजेचे आहे. शिवाजीमहाराजांनी त्यांच्या सर्व किल्ल्यांच्या रक्षणाची व जतन करण्याची जबाबदारी आपणा सर्वावर सोपविली आहे.    
किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन जल्लोषात
छत्रपती शिवरायांनी आपल्या पराक्रमाने किल्ले प्रतापगडावर अफझलखानचा कोथळा काढून वध केला. तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. महाबळेश्वर तालुक्यातील किल्ले प्रतापगडावर गेली सहा वर्षे हा सोहळा शासन व स्थानिकांच्या वतीने मोठय़ा जल्लोषात साजरा केला जातो. याही वर्षी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळय़ावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, श्रीभवानीमातेची शासकीय महापूजा व महाआरती, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून भव्य मिरवणूक, शिवरायांच्या पराक्रमाचा पोवाडा गायन अशा विविधतेने या वर्षीही तो मोठय़ा जल्लोषात साजरा झाला.

Story img Loader