पंतप्रधानपदासाठी माध्यमांनीच आपले नाव पुढे केले आहे. आजवर माध्यमांनी ज्यांची नावे पुढे केली त्यापैकी कोणीही पंतप्रधान झालेले नाही, असे सांगत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले. परंतु त्याच वेळी काम करता करता आपण काय होऊ इच्छितो ते आपसूक ठरते, असे सूचक विधान करत मोदी यांनी देशाचे नेतृत्व करण्याची सुप्त इच्छा अधोरेखित केली.
येथील एचपीटी आर्ट्स अ‍ॅण्ड आरवायके सायन्स महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी गुजरात दौऱ्यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. देशाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे का, या प्रश्नावर मोदींनी अत्यंत सावधपणे उत्तर दिले. माध्यमांनी आजवर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मायावती, चंद्राबाबू नायडू आदींची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे केली. यांच्यापैकी कोणीही पंतप्रधान होऊ शकले नाही. या वेळेस कोणाचे नाव पुढे न आल्याने माध्यमांनी आपले नाव पुढे केले, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकीय क्षेत्रात पदार्पण करताना आपण मुख्यमंत्री होऊ असे कधीच वाटले नव्हते. पण काम करत गेलो. जनतेने मुख्यमंत्री बनविले. भविष्यात असेच काम करत राहणार असून पुढे काय बनणार हे सांगता येत नाही, असे विधान करत जणूकाही पंतप्रधानपदाची सुप्त इच्छा त्यांनी अधोरेखित केली.
मुख्यमंत्री म्हणून काम करताना कठीण गोष्टी सोप्या करण्यावर म्हणजे लोकांच्या समस्या कमी करण्यावर भर दिला. वीज, रस्ते, पाणी यावर लक्ष केंद्रित केले. तेच इतरांच्या भाषेत गुजरातच्या ‘विकासाचे मॉडेल’ ठरले. हे मॉडेल आपण काही ठरवून केले नाही. युवक राजकारणात मोठय़ा संख्येने येत आहेत. प्रादेशिक पक्षांना घटनेच्या चौकटीत काम करावयाचे असल्याने अशा पक्षांच्या उदयाने देशाची एकात्मता आणि अखंडता धोक्यात येणार नाही, असे मोदी यांनी नमूद केले. आपल्यावर कोणत्याही प्रकारची टीका होत नाही तर आरोप होतात. टीका करण्यासाठी अभ्यास करावा लागतो. विचारमंथन करावे लागते. पण तसे करण्याची आपल्या विरोधकांची तयारी नाही. त्यामुळेच माझ्यावर टीका व्हावी, ही माझी अपेक्षा आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी टीका आवश्यक ठरते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गुजरातमधील विविध ठिकाणी भेटी दिल्या. त्यात अमूल, सेवा (महिला सबलीकरण), साबरमती आश्रम, साबरमती नदी विकास प्रकल्प, जगन्नाथ मंदिर, सुंदरबन, जैन मंदिर, अडलजा विहीर, अक्षरधाम, प्लाझ्मा रिसर्च सेंटर, इस्रो, वल्लभ विद्यानगर, बीआरटीएस प्रकल्प, स्वागत ऑनलाइन, मिशन मंगलम् प्रकल्प, विधानभवन आदींचा समावेश होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा