मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर जयसिंगराव पवारांच्या भूमिकेवर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. आता स्वतः जयसिंगराव पवार यांनीच कोल्हापुरातील राज ठाकरेंच्या भेटीविषयी निवेदन जारी करत मोठा खुलासा केला आहे.
जयसिंगराव पवार म्हणाले, “राज ठाकरे यांनी त्यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्याबरोबर इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली.”
“राज ठाकरेंशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा नाही”
“मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल आणि त्याचे मी स्वागत करेन, असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काहीही चर्चा झाली नाही,” अशी माहिती जयसिंगराव पवार यांनी दिली.
“मी पुरंदरेंच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली”
जयसिंगराव पवार पुढे म्हणाले, “राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी मला बाबासाहेब पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारला. त्यावर मी इतिहासकार म्हणून पुरंदरेंचे गौरवीकरण करणारे वक्तव्य केलेले नाही. कारण मी आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे.’
“…म्हणून मी हा खुलासा देत आहे”
“या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.