विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बोलत असताना छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते, असे विधान केले होते. त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रातून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया वर्तविण्यात येत आहेत. अनेकांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. तर काही निवडक लोकांनी अजित पवारांच्या वक्तव्याला समर्थन दिले. मात्र आता पुरोगामी वर्तुळातून देखील अजित पवार यांच्यावर टीका होताना दिसत आहे. पुरोगामी चळवळीतील नेते आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी देखील अजित पवारांचा दावा खोडून काढला आहे. तसेच अजित पवार हे अर्धसत्य सांगत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना कोकाटे म्हणाले की, “अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते धर्मवीर नव्हते. अजित पवार यांचे वक्तव्य हे अर्धसत्य आहे. महाराज स्वराज्यरक्षक होते, हे सत्यच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे त्यांनी रक्षण केले. त्यासाठी त्यांनी बलिदान देखील दिले. ते स्वराज्यरक्षक जसे होते, तसे धार्मिक परंपरांना माननारे देखील होते. ते शाक्त परंपरेंचे उपासक होते, असे संस्कृत पंडीत आणि प्राच्यविद्या पंडीत शरद पाटील सांगतात.”
हेही वाचा – ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”
धर्मनिरपेक्ष संकल्पना मध्ययुगीन महापुरुषांवर लादू नका
कोकाटे पुढे म्हणाले की, “संभाजी महाराजांनी बुधभुषणम, नखशिखांत (नखशिख), नायिकाभेद, सातशातक असे चार ग्रंथ लिहिले आहेत. त्या ग्रंथामध्ये संभाजी महाराजांनी शंभू महादेवाचे वर्णन केलेले आहे. भवानी मातेचे वर्णन केलेले आहे. त्यांनी आपल्या धार्मिक परंपरेचा प्रचंड अभिमान होता. त्यामुळे ते जसे स्वराज्यरक्षक होते, तसे ते धर्मवीर देखील होते. आजच्या काळातील धर्मनिरपेक्ष आणि निधर्मी संकल्पना मध्ययुगीन काळातील महापुरुषावर लादणे अनऐतिहासिक आहे. निधर्मी किंवा पुरोगामी या आधुनिक संकल्पना आहेत. या मध्ययुगी नाहीत. त्यामुळे आजच्या संकल्पना इतिहासावर लादू नयेत.”
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
विधानसभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर… धर्मवीर… उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली