Maharashtra Karnataka Border Conflict : डिसेंबर २०२२ मध्ये महाराष्ट् कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला होता. महाराष्ट्रातील नेत्यांना बेळागावात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. त्याच काळात हिवाळी अधिवेशन सुरू होते. त्यामुळे याचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने याप्रकरणी दोन्ही राज्यातील नेत्यांनी आगपाखड करू नये असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यानंतर हे प्रकरण आता शांत झालेले आहे. परंतु, कर्नाटकात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने तिथे या मुद्द्याला खतपाणी मिळाले आहे. दरम्यान, या प्रकरणावरून संजय राऊतांनी महाराष्ट्र कर्नाटक समन्वयक मंत्र्यांवर जोरदारा टीका केली आहे.
“चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई अशा दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई एकाकी लढत असताना हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले देखील नाहीत. इतिहासात याची नोंद राहील. Shame!Shame!! मराठी माणसांचे गद्दार. दुसरे काय?” असं ट्वीट करत संजय राऊतांनी एक फोटोही पोस्ट केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांच्या प्रतिमा असून त्यावर “हरवले आहेत”, असं लिहिलं आहे. सीमाभागात मराठी जनता संयुक्त महाराष्ट्रासाठी एकाकी लढत असताना त्यांना साथ द्यायचं सोडून हे कोणत्या बिळात लपून बसले आहेत हे त्यांचे त्यांनाच ठाऊक अशा या फोटोवर लिहिल्या आहेत.
हेही वाचा >> फडणवीस – राऊत शब्दयुद्ध; कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने बेळगावात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
संजय राऊतांचा बेळगाव दौराही गाजला
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारात सहभागी होताना खासदार राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. भगवा रंग शिवसेना आणि एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना शोभतो. भाजपच्या नेत्यांना बेळगावात मराठी माणसाच्या विरोधात प्रचार करताना लाज वाटली पाहिजे. मराठी माणसाच्या पराभवासाठी शिंदे येतात याची त्यांना लाज वाटत नाही का, असे टीकास्त्र त्यांनी डागले.