सलग १५ दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस, गारपीट व ढगाळ वातावरणामुळे गारवा वाढला होता. मात्र तीन दिवसांत तापमानात नऊ अंशांनी वाढ होऊन पारा ३५.७ अंशावर पोहोचला आहे. या कालावधीत हिवाळा, पावसाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूंचा नागरिकांनी अनुभव घेतला. अवकाळी पावसामुळे आता भाजीपाल्याचे दरही कडाडले आहेत.
जिल्ह्य़ास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक दिवस झोडपून काढले. अवकाळी पावसाने महावितरणचे जळगाव परिमंडळात अडीच कोटींचे नुकसान झाले. परिमंडळात २१८ खांब कोसळले. यामुळे अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाला. तात्काळ दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे. वीज कर्मचारी सध्या फांद्या काढणे, तुटलेल्या तारा बदलणे, वाकलेले खांब बदलण्याचे काम करत आहेत. अवकाळी पावसामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याची परिणती, जवळपास ३० टक्के दरवाढीत होऊन गृहिणींचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. जळगाव जिल्हा बाजार समितीत दररोज होणारी आवक घटल्याने व्यापाऱ्यांनी भाजी खरेदीसाठी परजिल्ह्य़ात धाव घेतली आहे. परंतु, नाशिक तसेच इतर जिल्ह्य़ांतून होणारी आवकही घसरली आहे. बटाटे, लसूण व गाजर उत्तर प्रदेशातून येत आहे. नाशिकहून सध्या केवळ सिमला मिरची, मटार, कोबी, तोंडली, शेवगा व कांदा येत आहे. काही व्यापारी पुणे जिल्ह्य़ातून भाजीपाला मागवत आहेत. मागील महिन्यात ५ ते १० रुपये किलो भावाने मिळणाऱ्या पालेभाज्या आता २० रुपयांवर गेल्या आहेत. गवार, कारले, दोडकेही कडालले असून त्यांचा भाव प्रत्येकी ५० रुपये प्रति किलो आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा