Cash For Votes in Maharashtra Assembly Election 2024: भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे विरार पूर्वमधील हॉटेल विवांतामध्ये उपस्थित असताना तिथे मोठा गदारोळ झाला. विनोद तावडे तिथे पैसे वाटत असल्याचा आरोप करत त्याचवेळी क्षितिज ठाकूर व त्यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे आले. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते व बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणवार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी जवळपास तीन तास बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला होता. एकीकडे भारतीय जनता पक्षानं हे आरोप फेटालून लावले असताना दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांनी भाजपातूनच विनोद तावडेंबद्दल सांगण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

हॉटेल विवांतामध्ये गोंधळ

विवार पूर्वमधील मनोरीपाड्यातल्या विवांता हॉटेलमधअये हा सगळा गदारोळ झाला. विनोद तावडेंकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. खुद्द क्षितिज ठाकूर यावेळी तिथे उपस्थित होते. क्षितिज ठाकूर यांनी काही डायऱ्या सापडल्याचं सांगत त्यात पैसे वाटप केल्याच्या अनेक नोंदी असल्याचं सांगितलं आहे. हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. “पाच कोटी रुपये घेऊन विनोद तावडे तिथे आले होते. दोन डायऱ्यादेखील तिथे मिळाल्या आहेत. कुठे कसं वाटप केलं वगैरे माहिती त्यात आहे. विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. यांना एवढी अक्कल नाही की नेत्यांनी ४८ तास आधी इतर मतदारसंघ सोडायचे असतात. एवढा साधा नियम आहे”, असं हितेंद्र ठाकूर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

“भाजपावाल्यांनीच माहिती दिली”

दरम्यान, विवांता हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी या सगळ्या प्रकाराबाबत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे. भाजपावाल्यांनीच आपल्याला विनोद तावडेंबाबत माहिती दिली होती, असं ते म्हणाले आहेत. “”मला भाजपावाल्यांनी सांगितलं होतं की विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन येतायत. मला वाटलं राष्ट्रीय नेते एवढं लहान काम करणार नाही. पण इथे पाहिलं तर पैसे वाटप चालू आहे, कार्यकर्तेही आहेत. या डायऱ्यांमध्ये नोंदी दिसत आहेत”, असा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Video: “विनोद तावडेंनी मला २५ वेळा फोन केले आणि…”, हितेंद्र ठाकूर यांचा मोठा दावा; पैसे वाटपाच्या आरोपांमुळे खळबळ!

दरम्यान, विनोद तावडेंनी आपल्याला २५ वेळा फोन करून माफी मागितल्याचाही दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. “विनोद तावडे मला फोन करून विनंती करत आहेत की सोडवा यातून, माझी चूक झाली. माझ्या फोनवर त्यांचे २५ फोन आले आहेत. तुम्ही बघा, मी ते डिलिट करत नाही. ते म्हणत आहेत मला माफ करा, आता जाऊ द्या”, असं ते म्हणाले.